Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यार्थी घरूनच देऊ शकतील अंतिम वर्षाची परीक्षा – उदय सामंत

 

मुंबई प्रतिनिधी । विद्यापीठ स्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. ३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

१५ ते ३० सप्टेंबरदरम्यान होणार्‍या प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात परीक्षा गेऊन ३१ ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा अशा पद्धतीच्या सूचना कुलगुरुंना केल्या असून कुलपती या नात्याने राज्यपालांनीही त्याच सूचना केल्या आहेत, असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

Exit mobile version