Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बोदवड उपसा सिंचन योजनेचा भोंगळ कारभार थांबवा ; अन्यथा आंदोलन

मुक्ताईनगर प्रतिनिधी । बोदवड परिसरातील उपसा सिंचन योजनेचा भोंगळ कारभार थांबवा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, याची प्रशासनाने नोंद द्यावी, अशा इशारा बहुजन मुक्ती पार्टीतर्फे देण्यात आला आहे.

बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत जॅकवेल २ (पंपहाऊस २) चे बांधकाम हे फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू झाले असून या कामामध्ये भरपूर अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे. हे पंपहाऊस ५ लिफ्टचे असून  ३ वर्षांत फक्त एकाच लिफ्टचे काम पूर्ण झाले असून यावरूनच सदर ठेकेदारांचा गलथानपणा लक्षात येत आहे. त्याच्या या भोंगळ कारभारावर संबधित अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी पांघरूण घातले जात असून एकप्रकारे सदर ठेकेदार आर्थिक हितसंबंध साधून अभय दिल्याचे वेळोवेळी लक्षात येत आहे.

या कामासाठी लागणारे स्टील हे २०१९ मध्ये च आणले असून दोन वर्षांपासून हे काम बंद असल्यामुळे आणलेले स्टील हे वातावरणातील नैसर्गिक बदलामुळे अत्यंत जीर्ण व जंगलेल्या परिस्थितीत असून हे काम आता या महिन्यामध्ये सुरू करण्यात आल्याने ३ वर्षांपासून जंग खात पडून असलेले स्टील आज रोजी वापरण्यात येत आहे. अंदाजपत्रकानुसार जर संबंधित ठेकेदारांना हे स्टील वापरायचे होते तर त्या स्टीलला आणले, त्याच वेळीस रेड ऑक्साईड मारून ठेवणे, बंधनकारक होते जेणेकरून त्या स्टीलवर वातावरणाचा कोणताही विपरीत परिणाम होऊन त्याची गुणवत्ता ढासळू नये. परंतु संबंधित ठेकेदाराचे वरिष्ठ निवृत्त अधीक्षक अभियंत्यांशी असलेल्या नात्यामुळे जो प्रकार इतर कामात होत आहेत तोच सावळागोंधळ जॅकवेल २ वर दिसून येत आहे. या संबंधित ठेकेदाराला जाब विचारला असता आम्ही क्वालिटी कंट्रोलचे रिपोर्ट मॅनेज करतो तुमच्याकडुन  जे होईल ते करून घ्या  कुठेही तक्रार करा आम्ही सगळे मॅनेज करू असे अरेरावीच्या भाषेत सांगितले जाते.

आज पर्यंत या जॅकवेल कामाच्या परिसरातील नागरिकांनी निकृष्ट कामांच्या वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आहेत परंतु प्रशासनातील भष्ट अधीकारी ठेकेदाराला पाठीशी घालुन त्याच्या भ्रष्ट कामांना आर्थिक देवान घेवाण करुन पाठबळ देत असल्याचे आतापर्यंतच्या निष्कर्षावरुन दिसुन येत आहे.तरि वरील विषयास अनुसरून आपणास विनंती अशी की पंप हाऊस २ मध्ये वापरण्यात येणारे तीन वर्षांपासून जंग खात पडून असलेले निकृष्ट स्टील तात्काळ बदलून नवीन स्टील वापरण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करावा.

अन्यथा शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या प्रकल्पाला पुर्णत:गुणवत्ताहिन बनविल्याचे एकंदरीत या सर्व कारभाराविरुद्ध बहुजन मुक्ती पार्टी तर्फे दि.२९/१०/२०२१ रोजी   जॅकवेल दोन  मुक्ताईनगर येथे  निषेध आंदोलन करण्यात येणार आहे याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

 

Exit mobile version