हिंगोलीत पोलीसांच्या छाप्यात जिलेटीन व डिटोनेटरचा साठा हस्तगत

हिंगोली – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था । जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिरला तांडा शिवारात  जिलेटीनच्या तब्बल ३२१ कांड्या आणि ५०० डिटोनेटर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हट्टा पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एका आखाड्यावरून जिलेटिन आणि डिटोनेटर जप्त करण्यात आले आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील शिवारात एका शेतात स्फोटक पदार्थ असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे, उपनिरीक्षक एस. एस. तावडे, जमादार भुजंग कोकरे, जीवन गवारी यांच्या पथकाने सोमवारी संध्याकाळी एकनाथ राठोड यांच्या शिरला तांडा शिवारातील आखाड्यावर छापा टाकला. यावेळी आखाड्याची तपासणी केली असता एका कोपऱ्यामध्ये जिलेटिनच्या कांड्याचा बॉक्स आणि डिटोनेटरचा बॉक्स लपवून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स काढून पाहणी केली. त्यामध्ये ३२१ जिलेटिनच्या कांड्या व ५०९ डिटोनेटर आढळून आले. पोलिसांनी दोन्ही बॉक्स जप्त करून एकनाथ राठोडयाच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Protected Content