रस्ते अपघतांसंदर्भात उपाययोजना करण्याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । रस्ते सुरक्षा सप्ताहनिमित्त वाढणाऱ्या अपघतांसंदर्भात उपाययोजना करा, अशी मागणी आज मानवधिकार न्याय जन सेवा ट्रस्टतर्फे उपजिल्हाधिकारी श्री. भारदे यांना निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष/महासचिव/संस्थापक अध्यक्ष दिनेशकुमार आर.गुप्ता यांचे आदेशानुसार उत्तर महाराष्ट्र विभागीय विधी सल्लागार अॅड. पी.सी.चौधरी, महाराष्ट्र प्रदेश सह सल्लागार प्रविणकुमार बाविस्कर, महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांच्या मार्गदर्शनाने आज (दि.५ ऑगस्ट २०२१) रोजी उपजिल्हाधिकारी भारदे यांना रस्ते अपघाताबाबत निवेदन देण्यात आले.

जळगाव शहर तसेच जिल्ह्य़ात जानेवारी २०२१ ते  जून २०२१ या कालावधीत ४०६ अपघात झाले असून यात २६३ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १९२ व्यक्ती जखमी झाले आहेत. सर्वाधिक अपघात हे चाळीसगाव, एम.आय.डी.सी.,पाचोरा,अमळनेर, भुसावळ,चोपडा व नशिराबाद पोलीस स्टेशन हद्दीत झालेले आहेत. जळगाव जिल्ह्य़ात झालेल्या एकूण अपघातांपैकी १६ टक्के अपघात हे वळण रस्त्यावर, २१ टक्के अपघात हे ओव्हर स्पीडमुळे तर ११ टक्के अपघात हे नशेत वाहन चालविल्यामुळे झालेले आहेत. अपघात व अपघातातील मृत्यू कमी करणे संदर्भात योजना करावी. जिल्ह्य़ातून जाणारा महामार्ग व इतर रस्त्यांवर सुरक्षिततेसाठी तयार केलेले दुभाजक,काही हॉटेल्स्, ढाबे व पेट्रोलपंप चालकांनी तोडल्यामुळे वाहतूकीस अडथळे निर्माण होत असून वाहतुकीची कोंडणी होत आहे.त्यामुळे वाहतूकीस अडथळे निर्माण करणार्‍यांवर कार्यवाही करावी.

जिल्ह्य़ातील रस्त्यांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रती तास ८० कि.मी.ही आदर्श वेग मर्यादा घालून दिलेली आहे.त्यानुसार अपघात टाळण्यासाठी वाहन चालकांनी या वेग मर्यादाचे पालन करावे याकरिता रस्त्यावर ठिकठिकाणी वेग मर्यादेचे बोर्ड लावण्याच्याही सुचना द्याव्यात. त्याचबरोबर शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी पारोळा व पाळधी येथील बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे.वाहनांचे अपघात रोखण्यासाठी पोलीस, परिवहन, सार्वजनिक बांधकाम विभागाने एकमेकांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात. जळगाव शहरातून जाणारा महामार्ग पाळधी ते तरसोद,तरसोद ते चिखली,खोटे नगर ते पाळधी फाटा ,तरसोद ते फागणे, बऱ्हाणपूर ते अंकलेश्वर, जळगाव, औरंगाबाद, जळगाव ते चाळीसगाव आदी रस्त्यांच्या कामाबरोबरच या रस्त्यांवरील विजेचे खांब, पाईपलाईन, विद्युत तारा हलविण्याच्या सुचना कराव्यात. जिल्ह्य़ातील महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून अपघातांचे प्रमाण हे निश्चीत कमी होण्यासाठी उपाय योजना करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळूंके, जिल्हा युवा उपाध्यक्ष राहुल निकुंभ, जिल्हा महीला सल्लागार वर्षा बाविस्कर, जिल्हा महीला पदाधिकारी डॉ.चिताजी धनगर, मिलिंद निकम, मंगेश सोनवणे, गणेश कोळी, हर्षल सावंत आदी पदाधिकारी यांनी कोरोना नियमांचे पालन करून निवेदन दिले आहे.

 

Protected Content