Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा क्रांती मोर्चाचे विविध मागण्यांसाठी महावितरण अधीक्षकांना निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आज दुपारी जळगावात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महावितरण विभागात एसईबीसी प्रवर्गातून निवड झालेल्या उपकेंद्र सहायक पदासाठी कागदपत्रे पडताळणीत डावलण्यात आलेल्या मराठा उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना नोकरीची संधी द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. तसेच मागण्यांचे निवेदन महावितरण अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले. 

यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, रवी देशमुख, प्रमोद पाटील, गणेश पवार, गणेश पाटील, रामधन पाटील, किरण पाटील, अविनाश पाटील, निलेश चौथे, विजय बांदल, देवेंद्र पाटील, संजय कापसे, गुणवंत पाटील, गुलाबराव आभाळे, विशाल देशमुख, बाबुलाल चव्हाण, योगेश कदम यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, त्यातच महावितरण विभागात उपकेंद्र सहायक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीसाठी 1 व 2 डिसेंबर रोजी कागदपत्रे पडताळणी केली जात आहे. परंतु, या कागदपत्रे पडताळणीत मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना जाणीवपूर्वक वगळण्यात येत आहे. हा एकप्रकारे मराठा समाजावर अन्याय आहे. मराठा समाजातील उमेदवारांना न्याय मिळावा, म्हणून महावितरण विभागाने एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागणीचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले.

Exit mobile version