Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहरातील मुस्लिम समाज आणि  जिल्हा मनियार बिरादरीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शुक्रवार १७ डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात अल्पसंख्यांक मंत्रालय, वक्फ बोर्ड, महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमी, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोग, मौलाना आझाद महामंडळ, पंतप्रधान पंधरा कलमी कार्यक्रम, जिल्हा अल्पसंख्यांक विकास नियंत्रण समिती मार्फत अल्पसंख्यांकांची विविध कार्य जोपासण्यासाठी या संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. परंतु या संस्थांमार्फत आवश्यक ती कारवाई केली जात नाही. यातील उदासिनता शासनाने दुर करावी, त्याचप्रमाणे अल्पसंख्यांकांना शैक्षणिक क्षेत्रात ५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अल्पसंख्यांक समाजाच्या योजनांसाठी बजेटमध्ये वाढ करण्यात यावी व जे बजेट खर्ची केले जात नाही ते पूर्णपणे खर्च करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात उर्दू भाषेला दुय्यम स्थान मिळाले पाहिजे, शासनाने अल्पसंख्यांक आयोगाची  व उर्दू अकॅडमीची स्थापना त्वरित करावी, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये उर्दू घर स्थापन त्वरित करावे यासह आदी मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

 

या निवेदनावर मनियार बिरादरीचे फारूक शेख, सैय्यद चाँद, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष मजहर पठाण, सलीम इनामदार, एजाज मलिक, फारूक अहेलेकार, काकर बिरादरीचे रियाज़ काकर, सिकलगर बिरदारीचे अनवर खान, मुजाहिद खान, डॉ. एम इकबाल शेख, मोहसीन शेख, शेख सलीम, हाफिज अब्दुल रहीम, हामिद शेख, कासिम उमर, मोहम्मद नईम, महबूब शेख, अकील मन्यार आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version