Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ओढरे येथील रस्त्यांची दुरुस्ती होण्याबाबत निवेदन

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील ओढरे येथे गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्य रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला असून तात्काळ रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेतर्फे तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

चाळीसगाव तालुक्यात ३० ऑगस्ट रोजी अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे अनेक जनावरे वाहून गेली. तर मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली. त्याचबरोबर शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र ओढरे गावालगत असलेल्या प्रकल्पातून पाणी विसर्ग होऊन पाण्याबरोबर मुख्य रस्ताच वाहून गेल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा दळणवळणाचा मार्गच बंद झाल्यामुळे त्यांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान या समस्येला घेऊन नागरिक वर्षानुवर्षे कवटाळले आहे. दरवर्षी सदर रस्त्यावर खचकडी भरून तात्पुरती रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत असे. परंतु आता सदर रस्ताच वाहून गेल्यामुळे सर्वांना ते अशक्य झाले आहे.

त्यामुळे हि समस्या तातडीने मार्गी लावावी अशी मागणी  ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेने तहसीलदार व उपअभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात सदर मुख्य रस्त्यावरून नागरिक दररोज ये-जा करीत असतात. चाळीसगाव शहरात येण्यासाठी त्यांना याच रस्त्याचा अवलंब करावा लागतो. दररोज या रस्त्यावर वाहनांची वर्दळ पहायला मिळत असे. परंतु सध्या हे चित्र येथे पहायला मिळत नाही. त्यामुळे तात्काळ बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी ग्लोबल बंजारा अस्तित्व संस्थेने केली आहे. यावेळी सप्ताहिक वंचिताचा प्रतिनिधी संपादक  योगेश्वर राठोड, राकेश गवळी, किशोर गवळी, गजानन चव्हाण, राहुल पाटील, राहुल पवार, सुनील राठोड, शिवानंद राठोड, राहुल राठोड, ज्ञानेश्वर बागुल व नवनाथ पवार आदी उपस्थित होते.

 

Exit mobile version