Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शेळगाव बॅरेजमधून प्रस्तावित सिंचन योजना शासकीय खर्चाने मंजूर करण्याबाबत निवेदन

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेळगाव बॅरेजमधून प्रस्तावित सिंचन योजना शासकीय खर्चाने मंजूर करावी, अशी मागणी अमोल जावळे यांनी ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी अमोल जावळे यांना लवकरच संबंधित विभागाचे मंत्री व अधिकारी यांची बैठक घेण्याचा शब्द दिला आहे.

तापी नदीवर शेळगाव बॅरेज हा मध्यम प्रकल्प असून तो जळगाव शहराच्या उत्तरेस १८ किमी अंतरावर शेळगाव गावाजवळ आहे. शेळगाव प्रकल्पाची साठवण क्षमता ४.११ अब्ज घनफूट आहे. शेळगाव बॅरेज प्रकल्पाचे मुख्य धरण बांधकाम व द्वार उभारणी ही सर्व कामे पूर्ण झाली आहे. बुडीतक्षेत्रातील खाजगी व सरकारी जमिनींचे भूसंपादन प्रक्रिया सुद्धा पूर्ण झालेली आहे व बुडीत क्षेत्रातील रस्त्यांचे व पुलांचे कामही पुर्णत्वास असल्याचे दिसते.

परीसरात ह्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीसाठा करणे आवश्यक आहे. याबाबत तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सर्व तांत्रिक बाबी तपासून पाणीसाठा करावा, सोबतच शेळगाव बॅरेज वरून प्रस्तावित उपसा सिंचन योजनेस शासकीय खर्चातून करणे बाबतच्या प्रस्तावास मान्यता प्रदान करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे अमोल हरिभाऊ जावळे यांनी ना.गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना केली आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी आमदार कृषिमित्र स्व.हरिभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सदर प्रकल्पास केंद्र शासनाने घोषित केलेल्या बळीराजा जलसंजीवनी योजने अंतर्गत प्रस्तावित प्रकल्पांच्या यादीत समाविष्ट करून घेत त्यास आवश्यक निधीसाठी केंद्र शासनाची २५% अनुदान व ७५% नाबार्ड मार्फत कर्ज स्वरूपात निधी तीन वर्षांमध्ये उपलब्ध करून देऊन सदर प्रकल्पासाठी मोठे योगदान दिले होते.

शेळगाव प्रकल्पाच्या माध्यमातून यावल तालुक्यातील (मुख्यत्वे डार्क झोन मधील) ९१२८ हेक्टर शेत जमिनच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. जळगाव व भुसावळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खाजगी औद्योगिक वसाहती, खाजगी उद्योग, भुसावळ शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी, भुसावळ रेल्वे जंक्शन व इतर रेल्वे वसाहतींसाठी, धरणाच्या आसपास असलेल्या जळगाव, भुसावळ व यावल तालुक्यातील ग्रामीण पाणी पुरवठ्यासाठी शाश्‍वत स्रोत व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. रावेर, यावल तालुक्यातील खालावलेल्या भूजल पातळी मध्ये नैसर्गिक पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढण्यास सुद्धा या माध्यमातून फार मोठी मदत होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांसाठी मनोरंजन व पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा फायदा होणार आहे.पुलांमुळे जळगाव ते यावल शहरातील अंतर २० किमीने कमी होणार आहे. तसेच यावल, फैजपूर, सावदा, रावेर, बऱ्हाणपूर व त्या मार्गाने पुढे जाण्यासाठी हा कमी अंतराचा व विना टोल सोयीस्कर मार्ग नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

Exit mobile version