Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने यावल गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा व परिसर नावीन्यपूर्ण स्वच्छ आणि सुंदर दिसाव्यात. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करण्यात याव्यात. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वतीने यावल गट शिक्षणाधिकारी नईम शेख यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, ‘संपूर्ण देशात कोरोना विषाणू महामारीने दोन वर्ष झाले उद्रेक मांडला होता. अजूनही काही प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झालेले आहे. याचा शिक्षण क्षेत्रावरती खुप मोठा परिणाम झाला असून कमी वयाच्या विद्यार्थ्यांवर शिक्षणाविषयीची आवड बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे. यासाठी यावल तालुक्यातील १५० च्या जवळपास सर्व जि.प. शाळा काही वर्ष व महिने बंद पडून असल्याने वाईट अवस्था झालेली आहे.

काही दिवसातच नवीन शैक्षणिक वर्ष २०२२-२३ हे १४ जूनपासून सुरू होणार आहे. यासाठी लहान विद्यार्थ्यांमध्ये कशा पद्धतीने आकर्षण निर्माण करता येईल याचा विचार करत शिक्षणाची आवड राहण्यासाठी ज्याही शाळेची अवस्था वाईट आहे. पडझड झालेली आहे. ते शाळा व परिसर नावीन्यपूर्ण स्वच्छ व सुंदर दिसाव्यात यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विद्यार्थ्यांच्या चांगल्या शिक्षणासाठी व मराठी जि.प. शाळा टिकण्यासाठी काही मागण्या केल्या आहेत.”

मागण्या खालीलप्रमाणे –

१ ) शाळेचे पत्रे , कौल यांची पाणी गळणार नाही अश्या पद्धतीने दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी .

२ ) तालुक्यात सर्व शाळेसाठी संगणकाची व्यवस्था करावी .

३ ) विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य जागी करावी.

४ ) प्रत्येक वर्ग ( बैठक खोली ) रंगकाम करून व बाहेरील भिंतीवर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या आधारावरती आकर्षण होईल असे भित्तीचित्रे रंगवावे.

५) शिक्षकांनी विद्यार्थ्यांना या वर्षाच्या तापमानाची परिस्थिती ( उष्णता ) ४६ ते ४७ डिग्री सेल्सीअस वाढली या करिता पर्यावरणाची माहिती देवून शाळेच्या बाहेरील पटांगणात शिक्षक व विद्यार्थ्यांकडून झाडे लावून त्यांचे परिपूर्ण संगोपन करावे.

या मागण्यांची पूर्तता झाल्यास जिल्हा परिषद मराठी शाळांचा स्थर उंचावेल व टिकून राहील हा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्देश असल्याचे निवेदनात सांगितले असून सर्व मागण्यांचा लवकरात लवकर सुरूवात करून पूर्ण व्हाव्यात. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गट यावल शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या निवेदनावर चोपडा यावल विभागाचे जिल्हा अध्यक्ष कलमाकर घारू, जिल्हा उपाध्यक्ष संजय नन्नवरे, तालुका अध्यक्ष जुगल पाटील, आकाश चोपडे यांच्या स्वाक्षरी आहेत.

 

Exit mobile version