Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचाेरा येथे माफक मागण्यांसाठी वारकरी संप्रदायाचे तहसीलदारांना निवेदन

पाचोरा प्रतिनिधी । वर्षानुवर्षे चालणारी पंढरपूर पायी वारीला शासनाने निर्बंध लावले आहे. पायी वारी सुरू करा या वारकऱ्यांच्या माफक मागण्यांसाठी विश्वू हिंदू परिषद व वारकरी संप्रदायाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्राची भूमी ही साधू – संतांची महान परंपरा लाभलेली पुण्यभूमी आहे. याच परंपरेतील वारी हा वारकरी संप्रदाय व वारकऱ्याच्या उपासनेचा व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेकडो वर्षांची पायी वारीची ही परंपरा मुघलांच्या तसेच इंग्रजांच्या काळात ही अबाधित होती. परंतु गेल्या वर्षी कोरोना संक्रमणामुळे पायी वारीची परंपरा खंडित झाली. पारतंत्र्यात किंवा स्वतंत्र भारतात उपासने करिता कधी ही कोणतीही परवानगी घेण्याची गरज भासली नाही. किंवा धर्मसत्तेने कधीही राज्यसत्येकडे तशी परवानगी मागितली नाही.

देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत आहे. हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रास सुरु आहेत. त्यात विना मास्क फिरणाऱ्या हजारोंची गर्दी होत आहे. लोक हवे तिथे मुक्त प्रवास करत आहेत. असे असताना वारकऱ्यांच्या उपासनेच्या मुलभूत अधिकारांवर गदा का आणण्यात येत आहे ? महाराष्ट्रात मुबलक लसीकरणाद्वारे कोरोना परिस्थिती नियंत्रणात असतांना वारीला विरोध का करण्यात येत आहे ? कोरोना संक्रमणाचे सर्व नियम पाळूनही सर्व बंधने ही फक्त शिस्तप्रिय वारकऱ्यांवर का लादली जात आहेत?

वारकऱ्यांच्या माफक मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी १७ रोजी पाचोरा विश्व हिंदू परिषद व वारकरी संप्रदाय यांचे तर्फे  तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संभाजी पाटील यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी ह. भ. प. सुनिल बुवा पाटील, पाचोरा विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री महावीर गौड, बजरंग दल जिल्हा सह संयोजक अतुल पाटील, विक्की महाराज (बाळद), प्रसाद महाराज डोलारे (पाचोरा) हे उपस्थित होते.

Exit mobile version