Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘भरड धान्य खरेदी केंद्रा’संदर्भात यावल शिवसेनेचे विविध मागण्यांचे तहसीलदारांना निवेदन

यावल प्रतिनिधी | “केंद्र शासनाच्या किमान ‘आधारभूत किंमत भरड धान्य योजने’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, धान्य खरेदीत पारदर्शकता असावी.” यासह विविध मागण्यांसाठी यावल शिवसेनेच्या वतीने यावलचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावल तालुका शिवसेना शाखाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, शिवसेनेचे तालुका प्रमुख रविन्द्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आज गुरुवार, दि. ६ जानेवारी रोजी निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, “केंद्र शासनाच्या किमान ‘आधारभूत किंमत भरड धान्य योजने’अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची फसवणूक होवू नये, धान्य खरेदीत पारदर्शकता असावी म्हणून खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीकोनातून सूचना व माहीती मिळावी याकरीता भरडधान्य खरेदी करतांना घट्टी किती लागेल? शेतकऱ्याच्या धान्यास प्रतवारी अनुसार भाव कसा दिला जाणार ? यात सरकारी हमाली फी प्रतिकिलो /क्विंटल किती लागेल ?, शेतकऱ्यांनी त्यांचे स्वत:चे पोते (बारदान ) आणले असल्यास प्रति बारदान किती रूपये त्यास तातडीने मिळतील ? आदी शंकाचे समाधान व्हावे”

यासह निवेदनात, ”मागील काही वर्षात भरडधान्य खरेदी केलेल्या धान्याच्या बारदानाचे पैसे शेतकरी बांधवांना अद्यापपर्यंत मिळालेले नसल्याचे तक्रार निवेदनात म्हटले असून, या सर्व विषयाची माहीती शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर उपलब्ध व्हावी. खरेदी केलेले भरडधान्य हे शेतकऱ्यांचेच असावे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याच्या ‘७ /१२’वर नोंद करून विक्री केलेली नसावी. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या धान्याची रक्कम खरेदी दराप्रमाणे तातडीने धनादेशव्दारे देण्यात यावी. या विषयावर केंद्र संचालकांनी विशेष लक्ष द्यावे” अशा मागण्यांचे निवेदन यावल तालुका शिवसेना शाखाच्या वतीने निवासी नायब तहसीलदार आर.के.पवार यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तुषार पाटील, तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, तालुका उपप्रमुख शरद कोळी, सेनेचे माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शहर उपप्रमुख संतोष धोबी, आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसैन तडवी, सागर देवांग, अजहर खाटीक, पप्पू जोशी, संतोष वाघ, योगेश चौधरी, प्रदिप लोणारी, भरत चौधरी, प्रविण अडकमोल, अनिल पाटील, किरण बारी, योगेश पाटील, नामदेव अडकमोल, सुधाकर धनगर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Exit mobile version