Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शालार्थ आयडी त्रुटी पूर्तता यादीमुळे शिक्षकांसमोर अडचणी

जामनेर , लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – शालार्थ आय डीचा प्रश्न गंभीर असून त्रुटी पूर्तता यादीसह अनेक समस्या शिक्षकांसमोर आहेत. तसेच अन्य समस्यांचे निवारण करण्यात यावे यासाठी शिक्षकांच्या प्रश्नांसंदर्भात आ.किशोर दराडे याना शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले.

शालार्थ आयडीचा प्रश्न गंभीर असून गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नसल्याने शिक्षकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. आर्थिक वर्ष मार्चअखेर असल्यामुळे शिक्षकांच्या आशा मावळत चालल्या असून अनेक शिक्षक अतिशय तनावांमध्ये आहे, त्यामुळे तात्काळ शालार्थ आयडी देऊन शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा होण्यासाठी आपल्याकडून ठोस पावले उचलण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षक आ. किशोर दराडे यांना दिले.
तसेच यासह त्रुटी पूर्ततेची शाळांना अनुदान देणे,अघोषित शाळा घोषित करून शाळांना अनुदान देणे,जुन्या प्रचलीत सूत्रानुसार अनुदान मिळणे या विषयांवर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. शनिवार 20 मार्च रोजी आ. गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याप्रसंगी जामनेरयेथे नाशिक विभागाचे शिक्षक आ. किशोर दराडे उपस्थित होते. यावेळी राज्यातील शिक्षकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमदार किशोर दराडे यांची भेट घेतली.
यावेळी जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील, जळगाव जिल्हा ज्युनियर कॉलेज संघटनेचे कार्याध्यक्ष शैलेश राणे, , प्रा.अनिल परदेशी, प्राथमिक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस दिलीप पाटील, ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका कल्पना पाटील, किरण सुरळकर, महेश पाटील , अर्चना चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आ. किशोर दराडे यांनी एचएससी बोर्डाचे अध्यक्ष नितीन उपासनी यांचेशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून २५ मार्च पर्यंत सर्व शालार्थ आयडी व ऑनलाइन शालार्थ ड्राफ्ट भरलेल्या शिक्षकांच्या खात्यावर वेतन अदा करण्यात येतील असा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे तूर्तास तरी शिक्षकांना दिलासा मिळाला असला तरी गेल्या आठ महिन्याचे वेतन २५ मार्चपर्यंत रोजी जमा झाल्यास अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा निर्माण झाली आहे. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. सुनील गरुड यांनीही दूरध्वनीवरून वरील समस्यांसंदर्भात निवेदन केले.

Exit mobile version