जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून सन २०२१-२२ च्या राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार डॉ. पंकजकुमार नन्नवरे, सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉ. दिनेश पाटील यांना तर सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार शेंदुर्णीच्या गरूड महाविद्यालयाला व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार विलास पाटील यांना जाहीर झाला आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून ६ नोव्हेंबर रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सन २०२१-२२ चे हे राज्यस्तरीय रा.से.यो. पुरस्कार आहेत. तत्कालीन रा.से.यो. संचालक डॉ. पंकजकुमार नन्नवरे यांना कार्यक्रम समन्वयक प्रशंसा पुरस्कार जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी येथील अ.र.भा. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील डॉ. दिनेश गरूड यांना सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी तर याच महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाच्या सामाजिकशास्त्र प्रशाळेतील समाजकार्य विभागातील विद्यार्थी विलास पाटील यांना सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठाला हे चार राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, रा.से.योचे संचालक डॉ. सचिन नांद्रे आदींनी अभिनंदन केले.