Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा ते शिर्डी पायी दिंडी यात्रेस प्रारंभ

palora

 

पारोळा प्रतिनिधी । शहरातील साई भक्तांच्या वतीने श्री साईबाबा मंदिर संस्थान येथून शिर्डी पायी दिंडी यात्रेचे आज सकाळी शिर्डीकडे प्रस्थान झाले. साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने ही दिंडी काढण्यात आली असून हे यंदाचे ११ वे वर्षे आहे. आज सकाळी ८ वाजता विधिवत मंत्रोच्चरने श्री साईबाबा यांचा अभिषेक व आरती पत्रकार तथा मनन बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अधक्ष्य विशाल महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

पायी दिंडीचे शहरातून साईबाबा मंदिरपासून सुरुवात होऊन मंडक्या मारोती चौक, आझाद चौक, लवण गल्ली, रथ चौक, गुजराथी गल्ली, न.पा. चौक, कजगाव नाका या मार्गावरून दिंडीने मार्गक्रमण करीत श्री निवासभाऊ नगरात नगरसेवक डी.बी पाटील यांच्या निवासस्थानी साऱ्या वारकऱ्यांना स्नेह भोजनाचा लाभ घेतला. तेथूनच तरवडेच्या दिशेने दिंडीचे प्रस्थान झाले.

दरम्यान पायी दिंडीत शेकडो भक्तगणाची मांदियाळी असून सुरेल सुमंगल भक्तगीतांनी लक्ष वेधले होते. आठ दिवसांच्या प्रवासात या दिंडीचा पहिला मुक्काम तरवाडे या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर दिंडीचा मुक्काम चाळीसागाव, हिरापूर, जळगाव खुर्द, राजापूर, कोटमगाव देवीचे येथे असणार आहे. दिंडीच्या आठव्या दिवशी (१८ नोव्हेंबर) शिर्डी येथे पोहोचणार आहे. सदरची दिंडी ही ह.भ.प सुरेशचंद्र महाराज, ह.भ.प जगन्नाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येते आहे. या दिंडीतील सर्व वारकऱ्यांना दोन वेळची भोजन सकाळचा नाश्ता, चहा सर्व व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे. या दिंडीची सांगता सोमवारी (१८ नोव्हेंबर) शिर्डी येथे होणार आहे.

दिंडीत असे असतील दैनंदिन कार्यक्रम
पारोळा ते श्री क्षेत्र शिर्डी येथे पायीदिंडी आठ दिवसात पोहचणार आहे. या आठ दिवसाच्या प्रवासात नियोजनबद्ध कार्यक्रमाची रेलचेल असते. ती अशी रोज सकाळी ५ ते ६ काकड आरती व भजन दुपारी १२ वाजता नैवेद्य आरती, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ सायंकाळी ७ वाजता धूप आरती, रात्री ८ ते ११ कीर्तन, भजन, प्रवचन सोबतच सुरेल भक्तगीत गायनासाठी गायनाचार्य म्हणून ह.भ.प छोटू महाराज, जयेश महाराज, प्रभाकर महाराज, देविदास महाराज, गोकुळ पाटील, समाधान महाराज, माऊली भजनी मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ यांची साथ लाभणार आहे.

यशस्वीतेसाठी राजेश नागपुरे, सुनील बारी, घनश्याम महाजन, सागर महाजन, योगेश महाजन, किरण नागपुरे, सोमनाथ पाटील, विशाल महाजन, गणेश महाजन, गोरख पाटील, हर्षल बारी आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version