Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एसटी कर्मचार्‍यांना कामावर येण्यास अडवू नका : अनिल परब

 

 

मुंबई प्रतिनिधी | एसटीचे काही कर्मचारी संपातून माघार घेत कामावर परत येत आहेत. त्यांना कुणी अडविण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.

राज्य सरकारने, एसटी महामंडळाने कर्मचार्‍यांच्या वेतनात वाढ केली. त्यानंतर संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले होते. एसटी कर्मचार्‍यांच्या संपात सहभागी झालेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी देखील आंदोलनातून माघार घेण्याची घोषणा केली. एसटी कर्मचार्‍यांनी पहिल्या टप्प्यातील विजय मिळवला असून पुढील निर्णय पूर्ण विचार करून घेण्याचे आवाहन केले होते. एसटी कर्मचार्‍यांना दिलेली वेतन वाढ आणि भाजप नेत्यांनी घेतलेली माघार यानंतर एसटी कर्मचार्‍यांना कामावर परतण्याचे आवाहन महामंडळाने केले होते. त्यानंतर शुक्रवारपासून राज्यातील एसटी वाहतूक सुरळीत होईल अशी शक्यता होती. यानुसार राज्यात आज काही ठिकाणी पोलीस संरक्षणात एसटी वाहतूक सुरू करण्यात आली.

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचार्‍यांचा संप लवकरात लवकर मिटेल असा विश्वास व्यक्त केला. एसटी कर्मचार्‍यांना वेतन वाढ आणि पगार वेळेवर व्हावा यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे. तर, दुसरीकडे नोकरीच्या शाश्वतीची मागणी सरकारने मान्य केली असल्याचे परब यांनी सांगितले. निलंबनाची कारवाई झालेले कर्मचारी आज सायंकाळपर्यंत कामावर पुन्हा रुजू झाल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

काही ठिकाणी कर्मचार्‍यांची संपकरी अडवणूक करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक न्यायलयाने संप बेकायदेशीर ठरवल्यास एसटी महामंडळाच्या तरतुदीनुसार, एक दिवसाच्या संपासाठी आठ दिवसांचा पगार कापण्यात येईल. त्यामुळे कर्मचार्‍यांनी लवकर कामावर रुजू व्हावे, कारवाई करण्यास महामंडळाला भाग पाडू नये असे आवाहन अनिल परब यांनी केले. तर कामावर अडविणार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.

Exit mobile version