Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अकरा वर्षांपूर्वीच्या अपहार प्रकरणात एसटी वाहक बडतर्फ

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एसटी आगाराचे संदीप वसंत भोळे (वाहक क्र. ५१४७) यांना वाहक पदावरून बडतर्फ करण्यात आले. एसटी महामंडळाकडून त्यांच्यावर अप्रमाणिकपणाचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

 

नाशिक नागपूर ड्युटी करीत असताना १९ जानेवारी २०१२ रोजी प्रवास भाडे १७३ रुपये असताना प्रवाशांकडून १०० रुपये वसूल करून तिकीट दिले नसल्यामुळे त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे त्यांच्याजवळ ५०० रुपये वैयक्तिक स्वरूपात आढळले.

 

यासंदर्भात मार्ग तपासणी पथकाने आपला अहवाल विभागीय वाहतूक अधिकारी यांना सादर केला होता. या अनुषंगाने मागील इतिहास लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने त्यांच्यावर कार्यवाही सुरू केल्याने त्यांनी कामगार न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाकडून स्थगिती मिळवून ते कामावर रुजू झाले होते. यादरम्यान संदीप भोळे यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयाशी पत्रव्यवहार केल्याने त्यांना बिल्डिंग इन्स्पेक्टरच्या पदभार तात्पुरत्या स्वरूपात सोपविला होता. परंतु तेथे तक्रारी उद्भवल्याने एसटी प्रशासनाकडून त्यांचा परत वाहक पदावर वापर सुरू करण्यात आला होता. अपहार प्रकरणी संदीप भोळे यांना न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्यामुळे विभागीय वाहतूक अधिकारी यांनी त्यांच्या बडतर्फीचे आदेश दिले आहेत. कोर्टकचेरीमुळे दिरंगाई होउन तब्बल अकरा वर्षांनी कारवाई झाल्याचा विषय सध्या चर्चेत आहे.या वृत्ताला विभागीय वाहतूक (अपराध) अधिक्षक किशोर महाजन यांनी दुजोरा दिला आहे.

Exit mobile version