Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून  सर्व योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे. असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी आज येथे केले.

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘विकसित भारत संकल्प यात्रा रथ’  योजनांच्या प्रचार – प्रसिद्ध मोहीमेत आज जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे भाषण थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले‌. जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमात ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सर्वसामान्य नागरिक व पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. खासदार उन्मेष पाटील हे चोपडा तालुक्यातील चांदसणी येथून व खासदार रक्षा खडसे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे मुक्ताईनगर येथून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आमदार, तालुक्यातील पदाधिकारी, जिल्हा प्रशासनातील उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी,‌ तहसीलदार व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

ग्रामविकास मंत्री श्री महाजन म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने विकासामध्ये गरुड भरारी घेतली आहे. देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावर पोहोचून देशाची प्रतिमा जगभरात उंचावत आहे. देशाच्या चौफेर विकासाबरोबरच विविध कल्याणकारी योजनांद्वारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम करण्यात येत आहे.

मुक्ताईनगर येथील कार्यक्रमात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचे दूरदर्शी निर्णय घेण्यात येत आहेत. देशातील प्रत्येक घटकासाठी योजना आखण्यात आल्या आहेत.

जिल्हाधिकारी श्री.प्रसाद म्हणाले, समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या व बॅंकिंग योजनांचा लाभ पोहोचल्यास लाभार्थ्यांचा वैयक्तिक व कौटुंबिक विकास होणार आहे.

जिल्ह्यातील २० ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे थेट प्रेक्षपण दाखविण्यात आले. थेट प्रेक्षपण ऐकण्यासाठी या गावांमध्ये गावकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, महिला, नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.‌कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Exit mobile version