Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गणेशोत्सवात दणदणाट : शेवटचे पाच दिवस रात्री १२ पर्यंत स्पीकर्सला परवानगी

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यंंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून राज्य सरकारने शेवटच्या पाच दिवसांसाठी रात्री बारा वाजेपर्यंत स्पीकर वाजविण्याची परवानगी दिल्याची घोषणा रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे दोन वर्षे गणेशोत्सवासह अन्य उत्सवांवर बंधने होती. एकनाथ शिंदे सरकारने आधीच सर्व उत्सवांवरील बंधने काढून टाकली आहेत. या पाठोपाठ काल रात्री उशीरा मुख्यमंत्र्यांनी एक अतिशय महत्वाची घोषणा केली. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयात मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील गणेशोत्सव मंडळांची बैठक झाली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, न्यायालयाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून यंदाचा गणेशोत्सव उत्साहात, धूमधडाक्यात साजरा करू. गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही, गणेशोत्सवाच्या अखेरच्या पाच दिवसात रात्री बारा वाजेपर्यंत स्पिकर वाजविण्याची परवानगी असेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा दणदणाटात साजरा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version