प्रियंकांमध्ये दिसते इंदिराजींची झलक ! : संजय राऊत

मुंबई प्रतिनिधी | चार खून पचवून जगातील सर्वात मोठा पक्ष हिंदूस्थानात झोपला असला तरी त्यांची झोप उडविण्याचे काम प्रियंका गांधी यांनी केल्याचे नमूद करत त्यांच्यात इंदिराजींची झलक दिसते अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या रोखठोक या कॉलममध्ये उत्तरप्रदेशातील घटनेवर भाष्य केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, चार शेतकर्‍यांच्या निर्घृण हत्येचे प्रकरण आता उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या अंगलट आले आहे. त्याच रात्री लखीमपूर खेरी येथे मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी निघालेल्या प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवले. प्रियंका गांधींना धक्काबुक्की केली व बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले. प्रियंका यांना सीतापूरला जबरदस्तीने नेले व डांबले. त्या घाणेरड्या जागेत झाडू हातात घेऊन प्रियंका यांनी साफसफाई केली. देशात स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने एक दिवस ज्यांनी झाडू घेऊन फोटो काढले, त्या लाखो फोटोंवर प्रियंका यांच्या एका झाडूने मात केली. नेते जेव्हा साहस दाखवतात तेव्हा कार्यकर्त्यांत विश्वासाची मशाल पेटते. सीतापूरला शेवटी तेच झाले.

यात पुढे म्हटले आहे की, विरोधकांची एकजूट होऊ नये व कॉंग्रेस कमजोरच राहावी हे भाजपला वाटणे व इतर विरोधकांनाही तेच वाटणे यात फरक आहे. प्रियंका गांधी लखीमपूर खेरीत जाताना त्यांना अडवले व तुरुंगात टाकले. दुसर्‍या दिवशी असंख्य लोक हाती मशाली घेऊन रस्त्यावर उतरले, तेव्हा सीतापूरला कॉंग्रेसकडे इतके कार्यकर्ते आले कुठून, हा प्रश्न अनेकांना पडला. गांधी घराण्याचे वलय आजही आहे. कॉंग्रेसला सहज संपवता येणार नाही, हे प्रियंकांच्या अटकेने पुन्हा स्पष्ट झाले. श्री. राहुल व प्रियंका गांधी अखेर लखीमपूर खेरीला पोहोचले व त्यांनी मृत शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यासाठी सरकारशी संघर्ष करावा लागला. इंदिरा गांधी हे सर्व करत होत्या. त्याचीच झलक प्रियंका गांधींच्या संघर्षात पाहता आली.

या स्तंभात शेवटी म्हटले आहे की, प्रियंका गांधी इंदिराजींची प्रतिकृती आहेत की नाही हे येणारा काळच ठरवेल. त्या काळाची सुरुवात झाली आहे हे सीतापूरच्या रस्त्यावर प्रियंका यांनी दाखवले. इंदिरा गांधी व त्यांची कॉंग्रेस नको म्हणून १९७७ साली विरोधक एकत्र आले व सत्ताधारी कॉंग्रेसचा पराभव केला. आज सत्तेवर नसलेल्या कॉंग्रेसचेही इतर विरोधकांना वावडे व्हावे याचे आश्चर्य वाटते. आज सगळ्यांना एकत्र करणारे जयप्रकाश नारायण नाहीत व लढण्याची प्रेरणा देणारे जॉर्ज फर्नांडिसही नाहीत. सगळेच तडजोडवादी बनले आहेत. या पार्श्वभूमीवर लखीमपूर खेरीचे प्रकरण, त्यातून निर्माण झालेली प्रियंका नावाची ठिणगीही महत्त्वाची वाटते.

Protected Content