Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एक हजार हेक्टर क्षेत्रावर होणार सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम

जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात उन्हाळी हंगामात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोलातर्फे (महाबीज) सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन ‘महाबीज’चे जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्याकरीता प्रती एकर १०० रुपये भरणा करुन आरक्षण करणे आवश्यक आहे. रावेर, अमळनेर, जळगाव, पाचोरा येथील सहाय्यक क्षेत्र अधिकारी तथा जिल्हा व्यवस्थापक, महाबीज यांच्याशी संपर्क साधत सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी व्हावे.

राज्यातील बहुतांश जिल्ह्यात यावर्षी झालेला सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे सोयाबीन बीजोत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात बाधित झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम – २०२२ करीता सोयाबीन प्रमाणीत बियाण्याचा तुटवडा येवू नये म्हणून राज्य शासनाच्या निर्देशान्वये महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्या. अकोला (महाबीज) मार्फत जळगाव जिल्ह्यात रब्बी/ उन्हाळी हंगाम २०२१/२२ करीता प्रमाणित सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम एक हजार दहा हेक्टरवर राबविण्यात येत आहे.

यामध्ये रब्बी / उन्हाळी २०११ या हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये सोयाबीन फुले संगम, फुले किमया, एमएयूएस 612, 2003-2, PKVM-8802 आदी वाणांचा बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या बीजोत्पादन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी एका गावात कमीत कमी १५ एकर क्षेत्रात बीजोत्पादन कार्यक्रम होणे अपेक्षित आहे. एका शेतकऱ्याने कमीत कमी २ एकर क्षेत्र नोंदणी तथा पेरणी करणे अनिवार्य आहे. बीजोत्पादन योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या पायाभूत बियाण्याचा पुरवठा ‘महाबीज’ कार्यालयामार्फत करण्यात येणार आहे. बियाणे शुल्क शेतकऱ्याने बियाणे उचल करण्यापूर्वी जिल्हा कार्यालयात भरणे अनिवार्य आहे. उत्पादित सोयाबीन बियाण्याकरीता महाबीज मुख्यालयाकडून आकर्षक असे खरेदी धोरण जाहीर करण्यात आलेले आहे. बीजोत्पादन कार्यक्रमाची १०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे पैसे भरुन १० डिसेंबर २०१० पर्यंत आगाऊ नोंदणी करण्यात येणार आहे. अशी माहिती पत्रकात नोंदण्यात आली असून अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधता येईल.

जळगाव, जामनेर, बोदवड, पारोळा : 9624128006. रावेर, भुसावळ, यावल, मुक्ताईनगर : 9975930014. अमळनेर, चोपडा, एरंडोल, धरणगाव : 7083569849. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव : 9922295539.

Exit mobile version