Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सौरव गांगुली होणार बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

sourav ganguly

मुंबई प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची बीसीसीआयचे नवे अध्यक्ष म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सौरभ गांगुली यांच्यासह ब्रिजेश पटेल यांनीही अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला आहे. परंतु, यात सौरव गांगुली यांचा पारडा जड असल्याचे दिसत आहे.

अध्यक्षपदाच्या नावावरून बीसीसीआयमध्ये दोन गट पडले होते. माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर व एन. श्रीनिवासन यांच्या गटांनी आपापली नावं पुढं केली होती. या दोन्ही नावावरून अनेक अंगांनी चर्चा झाली. अखेर गांगुलीच्या नावावर सर्वसहमती झाली. अध्यक्षपदासाठी गांगुलीचं नाव पुढं येण्याआधी या नावासाठी चर्चेत असलेल्या कर्नाटकटचे ब्रिजेश पटेल यांच्यावर आयपीएलचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शाह हे बीसीसीआयचे सचिव म्हणून तर, अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुणसिंह ठाकूर हे कोषाध्यक्ष म्हणून काम पाहतील. आसाम क्रिकेट असोसिएशनचे देवजीत सैकिया यांचे नाव सहसचिव पदासाठी चर्चेत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली आजच अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या २३ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेली बीसीसीआयची नियोजित वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द होण्याची चिन्हे आहेत. अध्यक्षपदी गांगुलीचे नाव निश्चित होण्याआधी पडद्यामागे अनेक घडामोडी घडल्या. मंडळाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन याचा गट ब्रिजेश पटेल यांच्या नावासाठी आग्रही होता. पटेल यांचा मार्ग मोकळा व्हावा म्हणून श्रीनिवासन यांनी शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेटही घेतली. त्याच दिवशी गांगुलीनंही शहा यांची भेट घेऊन अध्यक्षपदात रस असल्याचं सांगितलं. अनुराग ठाकूर यांचा गट गांगुलीच्या पाठिशी असल्याचं बोललं जातं. अखेर गांगुलीच्याच नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यामुळं त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

Exit mobile version