Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लडाखला पूर्ण राज्य दर्जाची मागणी करणाऱ्या सोनम वांगचूक यांनी २१ दिवसानंतर सोडले उपोषण; केंद्राचे मागणीकडे दुर्लक्ष

लेह-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवण्यासाठी आणि हिमालयातील पर्यावरणाच्या संरक्षण व्हावे, या मागण्यासाठी प्रसिध्द पर्यावरणवादी आणि समाजसुधारक सोनम वांगचुक यांनी ६ मार्च पासून उपोषण सुरू केले होते. त्यांनी २६ मार्च रोजी आज आपले उपोषण सोडले. हे उपोषण सुरू करण्यापूर्वीच त्यांनी हे उपोषण २१ दिवसाचे असेल असे जाहीर केले आहे. उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक म्हणाले की, हा आंदोलनाचा शेवट नाही तर एक नवीन सुरुवात आहे. उद्यापासून महिला उपोषण करणार आहेत. जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्यांसाठी आंदोलन करावे लागेल, तोपर्यंत आम्ही ते करू. पीएम मोदी हे रामाचे भक्त आहेत. प्राण जाये पर वचन न जाये ही रामाची शिकवण त्यांनी पाळली पाहिजे.

सोनम वांगचूक लडाखला पूर्ण राज्य, स्थानिक लोकांसाठी नोकऱ्यांमध्ये आरक्षण, लेह आणि कारगिलसाठी प्रत्येकी एक संसदीय जागा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीची अंमलबजावणी या मागण्यांसाठी आंदोलन करत होते. या वर्षाच्या सुरुवातीला बौद्ध-बहुल लेह आणि मुस्लिम-बहुल कारगिलच्या नेत्यांनी लेह-आधारित सर्वोच्च संस्था आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स च्या बॅनरखाली हातमिळवणी केली. यानंतर लडाखमध्ये प्रचंड निदर्शने आणि उपोषण सुरू झाले. त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी केंद्राने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. मात्र, आंदोलकांशी चर्चा यशस्वी झाली नाही. ४ मार्च रोजी लडाखच्या नेत्यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि सांगितले की केंद्राने मागण्या मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी वांगचुक यांनी लेहमध्ये उपोषण सुरू केले. या २१ दिवसांत त्यांनी केवळ मीठ आणि पाण्याचे सेवन केले.

Exit mobile version