Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आईच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळणाऱ्या मुलाने २ लाख गमावल्याने जीवन संपवले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. सायबर गुन्हेगार कधी नोकरीच्या आमिषाने तर कधी क्रिप्टो गुंतवणुकीच्या आमिषाने नागरिकांची फसवणूक करतात. यामध्ये कित्येक जण लाखो रुपये गमावतात. असाच एक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. नालासोपारा येथील एका १८ वर्षांच्या तरुणाने ऑनलाईन फसवणूक झाल्यामुळे आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारची आहे. अकरावीमध्ये शिकणारा वरुण (नाव बदललं आहे) आपल्या आईच्या मोबाईलवर ऑनलाईन गेम खेळायचा. यावेळी त्याला एक संशयास्पद लिंक असणारा मेसेज आला. या लिंकवर क्लिक केल्यानंतर काही मिनिटांमध्येच आणखी एक मेसेज आला, ज्यामध्ये २ लाख रुपये डेबिट झाल्याची माहिती होती. यानंतर त्याला समजलं की त्याची फसवणूक झाली आहे. आज तकने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर तरुणाने घाबरुन आत्महत्या केली. आई-वडील आपल्याला रागावतील या भीतीने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पोलिसांनी त्याचा मोबाईल ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे. या तरुणाच्या घरातून कोणत्याही प्रकारची ‘सुसाईड नोट’ मिळाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सायबर फसवणूक झाल्याचं समजल्यानंतर या तरुणाने घाबरून कीटकनाशक प्राशन केलं. यानंतर त्याच्या घरच्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. सुरुवातीच्या लक्षणांनुसार मृत्यूचं कारण दारुचं अतिसेवन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र नंतर त्याने कीटकनाशक प्राशन केल्याचं स्पष्ट झालं.

Exit mobile version