होतकरू व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजाने सदैव कटिबद्ध असावे :एम.टी.लुले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  ‘होतकरु व गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समाजाने सदैव कटिबद्ध असावे.’ असे भावनिक आवाहन ज्येष्ठ समाजसेवक तथा मंडळाचे सचिव एम.टी.लुले यांनी केले.

प्रसाद बाळकृष्ण गणुरकर या विद्यार्थ्याने सी.ए. परीक्षेत यश प्राप्त करून समाजाचा नावलौकिक वाढविल्याबद्दल विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ, जळगावतर्फे आयोजित विद्यार्थी गुणगौरव सत्कार समारंभात मार्गदर्शन करताना लुले बोलत होते.

शहरातील आंबेडकर मार्केटजवळील सुतार समाजाच्या विद्यार्थी वस्तीगृहाच्या सभागृहात सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष अरुण जाधव असून प्रमुख अतिथी उद्योजक विलास सुतार, मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनवणे, प्रशांत इंगळे आदींची यावेळी उपस्थिती होती.

लुले यांनी पांचाळ सुतार समाजातर्फे बांधल्या जाणाऱ्या विद्यार्थी वस्तीगृहाच्या बांधकामाची प्रगती सांगून उपस्थितांना आर्थिक सहकार्याचे आवाहन केले. प्रसाद गणूरकरांच्या गौरवार्थ बोलतांना निवृत्त शिक्षक विजय लुल्हे म्हणाले की, “गुणवंत विद्यार्थी समाजाच्या गतिमान विकासाचे कालातील दीपस्तंभ असतात. गुणवंतांना सन्मानासह आर्थिक सहकार्य करणे सर्वोत्तम समाजकार्य आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच समाजातील गुणवंत व्यक्तींना निर्लेपपणे समाजसेवेत सामावून घेतले पाहिजे. असे आवाहनही सकाराप्रसंगी लुल्हे यांनी केले.

गौरवपर भाषणांतर्गत विलास सुतार, ॲडव्होकेट संतोष सांगोळे यांनीही आपले विचार मांडले. यावल येथील प्रशांत इंगळे यांनी समाजासाठी सदासर्वदा उपयुक्त कौटुंबिक परिपूर्ण तपशिलासह “ऑनलाइन अपडेट डिजिटल डायरी” या संबंधात प्रबोधन केले. प्रसाद गणूरकर यांचा सत्कार विश्वकर्मामय पांचाळ सहाय्यक मंडळ जळगाव तर्फे मंडळाध्यक्ष अरुण जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम पुस्तक भिशीतर्फे गणुरकर यांना शाल, श्रीफळ व बुके तसेच जळगावच्या दीपस्तंभ प्रकाशनाचा मोटीव्हेशनल ग्रंथ देऊन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी सत्कार केला. याप्रसंगी एस.एस.सी. परीक्षा सन २०२० मध्ये खान्देशातून प्रथम क्रमांक पटकावणारी सुकन्या समिक्षा लुल्हे आणि ऋषाली इंगळे यांची उपस्थिती होती.

सत्काराला उत्तर देतांना सी.ए.प्रसाद गणुरकर यांनी, मातापित्यांची संस्कारशील प्रेरणा, गुरुजनांचे अतुलनीय मार्गदर्शन, माझी अदम्य निरंतर जिद्द ही माझ्या अल्प यशाची त्रिसूत्री आहे. समाजाने केलेला सत्कार मला अखंड समाजसेवेची जबाबदारी देण्याचा अनौपचारीक दिक्षांत समारंभाच वाटला.” असे सांगितले.

या सत्कार समारंभास प्रसाद गणुरकर यांचे वडील ॲडव्होकेट बाळकृष्ण सोनवणे तसेच आई निर्मला गणूरकर, विश्वकर्मा पांचाळ सहाय्यक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. बी.डी. सुतार, मनोहर लुले ( खजिनदार ), गोपाळ लुले (सेवानिवृत्त महानगर पालिका मुख्य अभियंता ), शशिकांत रोडेकर, दिलीप सोनवणे, विश्वकर्मा विकास मंडळ प्रदेशाध्यक्ष संजय दिक्षित, अविनाश सुतार यांसह समाजातील शिक्षणप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन भागवत रुले यांनी केले. 

Protected Content