Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

एकाच मंचावर बहीण-भाऊ

बीड-वृत्तसेवा । महाराष्ट्र ज्यासाठी आतूर होता, तेच बीडमध्ये घडलं. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते, तसेच बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकाच मंचावर आले. हे चित्र पाहून बीडमधील प्रत्येक ग्रामस्थ सुखावला. यावेळी दोन्ही भावाबहिणींनी एकमेकांवर स्तुती सुमने उधळली. पहिल्यांदाच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकमेकांवर मुक्तकंठाने स्तुती करत होते. यावेळी धनंजय मुंडे यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. यापुढे पंकजाताई आणि मी मिळून बीडचा विकास करणार आहोत, अशी घोषणाच धनंजय मुंडे यांनी केली. धनंजय मुंडे यांच्या घोषणनेनंतर उपस्थितांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला.

बीडमध्ये राज्य सरकारने शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच मंचावर आले होते. पंकजा मुंडे यांनी या कार्यक्रमाला संबोधित करताना धनंजय मुंडे यांची स्तुती करतो. मला मीडियाने विचारलं ताई तुम्ही या कार्यक्रमाला आलात हे प्रमुख आकर्षण आहे का? मी म्हटलं, मंचावर सर्व आमदार आहेत. त्यामध्ये माझा संवैधानिक रोल नाही. पाच वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मी काम केलं. परळीची सेवा करताना वैद्यनाथ तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा असं मनात वाटायचं. तेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते. तेव्हा या कामाचं बीजारोपण केलं. धनंजय मुंडे यांचं अभिनंदन करते. तीन वर्ष कोविड होतं. सत्तांतर होतं. आता ही योजना पुढे जाईल. अत्यंत चांगलं काम या माध्यमातून झालं पाहिजे. या वैद्यनाथाचा आशीर्वाद आपल्याला लाभला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

परळीच्या विकासासाठी मी कोणत्याही मंचावर जाण्याची तयारी आहे. हे दाखवण्यासाठी आले. मी जात धर्म पाहत नाही. कोणत्याही पक्षाच्या लोकांना त्रास दिला नाही. द्वेष मनात ठेवला नाही. या जिल्ह्याचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे. धनंजयच्याही डोक्यावर आहे. विकास तुमच्या पदरात देणं हे आमचं कर्तव्य आहे. आज परळीच्या विकासासाठी मी सर्वांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल. वंचिताचा वाली बनण्यासाठी खांद्याला खांदा लावून काम करू, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यासोबत काम करण्याचे संकेत दिले.

यावेळी धनंजय मुंडे यांनीही जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनीही पंकजा यांचं तोंडभरून कौतुक केलं. जीवनात अनेक सभा केल्या. अनेक कार्यक्रम केले. पण शासन आपल्या दारी निमित्ताने पहिल्यांदा असा कार्यक्रम होत आहे. व्यासपीठावरील सर्वांना बोलावं असं वाटेल असा हा कार्यक्रम आहे. एवढी गर्दी पाहिल्यावर तोंडातून शब्द फुटू नये इतकी गर्दी आहे. माझीच नजर न लागो माझ्या वैभवाला.

बीड जिल्ह्यातील 36 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. या तिघांमुळे 1400 कोटीचा निधी आला. यापूर्वी एवढा निधी कधी आला नाही. एवढा निधी दिला त्यासाठी आभार मानतो. बीडच्या मागे ताकदीने उभे राहिला आहात. विकासाची गंगा तुम्ही देत आहात. थोडेसे आणखी हात ढिला करा. हा बीड जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळखला म्हणून ओळखला जाणार नाही. ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणार नाही, एवढा आम्ही विकास करू, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

आजच्या कार्यक्रमाचं आकर्षण काय? हे लोकांनी मला विचारलं. ताईंनी त्यावर सांगितलं. या कार्यक्रमाचं आकर्षण म्हणजे ताई आणि मी एकत्र आहे. बाळा काका आणि सुरेश अण्णा एकत्र आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा एकत्र आहेत. असं सर्व पाहिल्यावर तुम्ही खरंच राज्याचे एकनाथ आहात. एकनाथामुळे एकी निर्माण होते. हे निश्चित आहे. ताईंनी विकासाची सुरुवात केली. आपण विकासाच्या मध्यावर आहोत. आम्ही दोघे मिळून आम्ही बीडचा विकास करून दाखवू. यापलिकडे दुसरं कोणतं वचन देऊ शकत नाही, असंही ते म्हणाले. कोकणात कोको कोला दिला. आम्हाला फँटा तरी एमआयडीसीत द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

 

Exit mobile version