Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जागतिक विजेतेपद मिळवीत सिंधूने रचला इतिहास

p.v. sindhu

बर्न, वृत्तसंस्था | भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने आज इतिहास रचत जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय ठरली. अंतिम लढतीत सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराला २१-७, २१-७ असे पराभूत केले. सिंधूने हा सामना जिंकून सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताकडून कोणत्याही पुरूष किंवा महिला खेळाडूने अशी ऐतिहासिक कामगिरी केलेली नाही.

 

बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीतील चौथ्या क्रमांकाची खेळाडू जपानच्या नोझोमी ओकुहाराशी सिंधूचा सामना झाला. रँकिंगमध्ये पाचव्या क्रमांकावर असलेल्या सिंधूने ओकुहाराला अवघ्या ३७ मिनिटांत सरळ सेटमध्ये २१-७, २१-७ ने पराभूत करून जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. सुरुवातीलाच सिंधूने आक्रमक खेळी करत दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ती यशस्वीही झाली. सिंधूने नेट प्लेसिंग आणि परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ करताना अवघ्या १६ मिनिटांत पहिला गेम २१-७ असा नावावर केला. सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग आठ गुणांची कमाई केली. त्यामुळे ओकुरावर तणाव वाढत गेला आणि नेमका त्याच परिस्थितीचा फायदा घेत सिंधूने पुढच्या अवघ्या सहा मिनिटांत ओकुहारावर ७-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने प्रचंड आत्मविश्वासाने खेळ करीत ओकुहाराचा सहज पराभव केला. सिंधूने हा सामना २१-७, २१-७ असा जिंकला.

Exit mobile version