Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरात उद्या रजत जयंती महोत्सव

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । संपूर्ण खान्देशचे आकर्षण असलेल्या अमळनेर येथील बी.ए.पी.एस.श्री स्वामींनारायण मंदिरास 25 वर्ष पूर्ण होत असल्याने उद्या भव्य रजत जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रकट ब्रह्मस्वरूप परम पूज्य महंतस्वामी महाराज यांच्या प्रेरणा आशीर्वादाने हा महोत्सव होणार आहे. या उत्सवाचे महत्व म्हणजे पू भक्तीप्रिय स्वामीजी(कोठारी बापा) यांची विशेष उपस्थिती या महोत्सवात लाभणार आहे,तत्पूर्वी सोमवार दि.28 मार्च रोजी रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान भक्तिमय भजन संध्या,”कीर्तन आराधना”हा कार्यक्रम होणार आहे.तर 29 रोजी रजत जयंती महोत्सवात सकाळी 8 ते 10.30 वाजेदरम्यान विशिष्ट अभिषेक महापूजा व सकाळी 11 ते 12 दरम्यान पू कोठारी स्वामी यांच्या प्रासंगिक कथामृताचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर दुपारी 12 ते 2 वाजेदररम्यान सर्व उपस्थित भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे. हे सर्व कार्यक्रम बी.ए.पी.एस श्री स्वामी नारायण मंदिर, प्रमुख स्वामी महाराज मार्ग,अमळनेर येथे होणार आहेत तरी सर्व भाविक भक्तांनी दर्शन, सर्व धार्मिक कार्यक्रम आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे. प पू.प्रमुख स्वामींच्या हस्ते झाली होती.

अमळनेर येथील श्री स्वामी नारायण मंदिराचे वैशिट्य म्हणजे महाराष्ट्रात मुंबई नंतर केवळ अमळनेर येथील मंदिराचीच प्राणप्रतिष्ठा प. पू. प्रमुख स्वामी महाराजांच्या हस्ते विक्रम सवंत 2052 पौष वद्य द्वितीया म्हणजे 7 जानेवारी  1996 साली झाली आहे. अन्यथा इतर मंदिरातील केवळ मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा प्रमुख स्वामींनी आहे तेथून केली आहे. हे मंदिर निश्चितपणे अमळनेर शहराची शोभा वाढविणारे आहे. तसेच हे मंदिर मनशांती, सदविचार, आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रवर्तन करणारे केंद्र आहे,शिखर बद्ध स्वरूपातील मंदिर असून मंदिरात तीन खंडामध्ये अतिशय सुंदर भगवंताच्या मूर्ती विराजमान आहेत. खंडामध्ये अक्षर पुरुषोत्तमची मूर्ती आहे आणि मध खंडाच्या उत्तरेला राधा कृष्णाची तर दक्षिणेतील खंडामध्ये सर्वांचे शुभसंकल्प व मनोकामना पूर्ण करणारे भगवान स्वामींनारायनाचे बालस्वरूपातील घनश्याम महाराजांची मूर्ती आहे. याठिकाणी असलेल्या चरित्रवान संतांच्या सानिध्यामुळे अनेकांचे जीवन परिवर्तन होऊन अनेक जण व्यसनमुक्त झाले आहेत.इतकेच नव्हे तर उच्चशिक्षित असलेल्या गोपाल चौधरी आणि नरेंद्र साळुंखे या दोघांनी साधुची दीक्षा घेतली आहे.

मंदिरात नियमित होणारे कार्यक्रम उपक्रम

श्री स्वामीनारायण मंदिरात दररोज सकाळी व संध्याकाळी आरती,दर पौर्णिमेला संकल्पपूर्ती महापूजा, दिवाळी पाडव्या नंतर 1000 पदार्थांचा भव्य अन्नकूट महोत्सव होत असतो,तसेच सामाजिक उपक्रमांतर्गत दर रविवारी सायंकाळी 4 ते 6 बाल विकास केंद्र,दर रविवारी सायंकाळी 4 ते 6 बालिका विकास केंद्र,दर शुक्रवारी सायंकाळी 7.30 ते 8.30 युवक विकास केंद्र,दर रविवारी सायंकाळी 6 ते 7.30 युवती विकास केंद्र,दर बुधवारी दुपारी 5 ते 7 महिला संत्संग आणि दर रविवारी सायंकाळी 6 ते 8 विशेष सत्संग सभा व महाप्रसादाचे आयोजन केले जात असते.याव्यतिरिक्त वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात.

 

Exit mobile version