Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावातील व्यापारी संकुले मंगळवार, गुरूवार व शनिवारी बंद राहणार

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सर्व प्रमुख व्यापारी संकुले ही ५ ऑगस्टपासून सुरू होत असली तरी मंगळवार, गुरुवार, शनिवारी बंद ठेवून इतर ४ दिवस उघडी ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन आणि व्यापार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, जर या नियमानुसार व्यापारी संकुलात अधिक गर्दी होत असल्यास पुन्हा सम-विषम पद्धतीने दुकाने उघडण्यात येतील असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जाहीर केला.

मनपाच्या दुसर्‍या माळ्यावर असलेल्या सभागृहात सोमवारी शहरातील सर्व व्यापारी संकुलातील व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. सभेच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापौर सौ.भारती सोनवणे, आ. राजूमामा भोळे, मनपा आयुक्त सतीश कुळकर्णी आदी उपस्थित होते.
प्रारंभी प्रशासनाकडून सर्व व्यापारी संकुलांना एकच नियमावली लागू राहील, सम, विषम पध्दतीने दुकाने उघडण्यात येतील, सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत दुकान उघडे ठेवता येतील, व्यापारी संकुलातील दुकाने दुकान क्रमांक सम, विषम पद्धतीने विभागून उघडता येतील आदी नियम व्यापार्‍यांसमोर मांडले. व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांकडून त्यावर सूचना मागविल्या. बैठकीत झालेल्या नियमाचे अधिकृत आदेश मंगळवारी काढण्यात येणार असून प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. १५ ऑगस्टपर्यंत बैठकीतील निर्णयानुसार दुकाने उघडण्यास मुभा असणार असून सर्व सुरळीत राहिल्यास पुढील निर्णय घेण्यात येईल, असे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

व्यापार्‍यांकडून आल्या सूचना

दरम्यान, या बैठकीमध्ये व्यापार्‍यांनी काही सूचना मांडल्या. यात सोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने उघडी ठेवावीत. शनिवार, रविवार संकुलांसह दाणाबाजार आणि भाजीपाला देखील बंद ठेवावा असे मत मांडले. तसेच एखाद्या वेळी व्यापार्‍याकडून चूक झाल्यास दुकानाला सील न लावता जागेवरच दंडात्मक कारवाई करावी, दुकानात ५ व्यक्ती किंवा ५ ग्राहक संकल्पना स्पष्ट करावी, हॉकर्सवर कारवाई करावी, व्यापारी संकुलांना लावलेले पत्रे उघडावे, संपूर्ण मार्केट एक दिवस उघडावे, एक दिवस बंद ठेवावे, दुकानांची वेळ कमी करा परंतु सर्व एकाच वेळी उघडण्यास परवानगी द्या अशा सूचना मांडल्या. यानंतर शहरातील संकुले ही मंगळवार, गुरूवार आणि शनिवारी पूर्णपणे बंद राहतील असा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भात महापौर भारतीताई सोनवणे म्हणाल्या की, व्यापार्‍यांची अडचण आम्हाला समजते परंतु स्वतःची आणि शहराची काळजी घेणे आपल्याच हातात आहे. व्यापार्‍यांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. दुकानात सॅनिटायझर, थर्मल स्कॅनर, मास्कचा उपयोग करावा, गर्दी टाळावी, जो व्यक्ती मास्क आणि नियमांचे पालन करणार नाही त्याला सामान देऊ नये, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले.

Exit mobile version