Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून; पतीला अटक

धरणगाव प्रतिनिधी । तालुक्यातील खर्दे येथे पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी पतीला धरणगाव पोलिसांनी अटक केली असून पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

विठाबाई नामदेव जाधव रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड हल्ली मुक्काम खर्दे तालुका धरणगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, विठाबाई जाधव ह्या पती नामदेव रामा जाधव यांच्यासह वास्तव्याला आहे. खर्दे येथील विट भट्टीवर काम करून उदरनिर्वाह करतात.  ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विठाबाई जाधव या घरी असताना पती नामदेव जाधव याने विट भट्टीसाठी कोळसा व  गवत आण असे सांगत होता. त्यावेळी पत्नी ही दारू पिली असल्यामुळे त्याला दारूच्या नशेत शिवीगाळ करत होती. याचा राग आल्याने रागाच्याभरात नामदेव जाधव याने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात व चेहर्‍यावर मारून तिला बेशुद्ध केले. दरम्यान जखमी अवस्थेत नामदेव जाधव यांनी पत्नीला साप चावल्याचा बनाव करून रुग्णालयात दाखल केले होते. चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी नामदेव जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

 

Exit mobile version