Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

धक्कादायक : दुचाकीवर आलेल्या चौघांकडून जबरी लुट

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दिवसभरातील वसुलीचे पैसे मालकाच्या घरी देण्यासाठी जात असतांना एका प्रौढाच्या गळ्यात टांगलेली ३२ हजारांच्या रकमेसह महत्वाची कागदपत्रे असलेली पिशवी दुचाकीवर आलेल्या चौघांनी जबरी हिसकावून लांबविल्याची घटना शनिवारी रात्री घडल्याचे समोर आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आसोदा येथील रहिवाशी मकबुल शब्बीर पिंजारी (वय-४६) हे वास्तव्यास असून ते गेल्या ३५ वर्षांपासून किशोर शांताराम राव यांच्या गरजपुर्ती स्टेशनरी व होलसेल दुकानातील वसुलीचे काम पाहत आहेत. त्यासाठी ते मालकाची (एमएच १९ एएच ६८८५) क्रमांकाची दुचाकी वापरतात. दररोज सकाळी मकबुल हे किशोर राव यांच्या घरी जावून त्यांनो सोबत घेवून दुकानावर जातात. त्यानंतर दिवसभर मालाची वसुली केल्यानंतर रात्री ते वसुल झालेली रोकड आणि दुचाकी मालकाच्या घरी त्यांच्याकडे सुपुर्द करीत घरी निघून जातात. नेहमीप्रमाणे मकबुल पिंजारी यांनी शनिवारी ६ जानेवारी रोजी दिवसभर दुकानाची वसुली केली. वसुल केलेली सुमारे ३२ हजारांची रोकड आणि ग्राहकांनी दिलेले धनादेव व रिसीट बुक घेवून पिंजारी हे रात्री १० वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधून प्रतापनगरकडे मालकाच्या घरी जाण्यासाठी निघाले. मालकाच्या घरी पोहचल्यानंतर ते दुचाकीवरुन खाली उतरत असतांना समोरुन दुचाकीवर दोन अज्ञात इसम त्यांच्याकडे आले. त्यांनी पिंजारी यांच्या गळ्यात अडकवलेली रोकड असेलेली बॅग खेचली. परंतू पिंजारी यांनी बॅग घट्ट पकडून ठेवत जोरजोरात आरडाओरड केली. याचवेळी दुसरे दुचाकीस्वार दोन तरुण तेथे आले. ते देखील पिंजारी यांच्या हातातील बॅग जबरदस्तीने ओढून ते चौघे तेथून पसार झाले.  अखेर रविवारी ७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version