Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ब्रेकींग : ॲड. विजय भास्कर पाटील यांच्यासह इतर दोन जण पोलीसांच्या ताब्यात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कौटुंबिक वादातून घरातील १२ लाख ४० हजार रूपये किंमतीच सोन्याचे दागिने जबरी हिसकावून मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात ॲड. विजय भास्कर पाटील यांच्यासह इतर दोन जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

पियुष नरेंद्रआण्णा पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पियुषचे वडील नरेंद्रआण्णा पाटील यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या नावे असलेल्या बँकेतील लॉकर हे बंदच होते. त्या लॉकरमध्ये पियुषच्या आईचे दागिने ठेवण्यात आलेले होते. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर पियुष हा काका संजय भास्कर पाटील यांच्या सोबत बँकेत गेला. कागदपत्रे दिल्यानंतर ११ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ लाख ४० हजार रूपये किंमतीचे दागिने व महत्वाची कागदपत्रे घरी आणले होते. दरम्यान, त्यांच्या घराच्या तळमजल्यावर राहत असलेले काका ॲड. विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नेरंद्र गांगुर्डे यांनी संगनमत करून पियुष जवळील सोन्याचे दागिने जबरी हिसकावून बेदम मारहाण केली. तर पियुषची आई ज्योती यांना अश्लिल शिवीगाळ केली. त्यानंतर वारंवार दागिने मागितले असता दागिन्यांशी तुमचा काहीही संबंध नाही, दागिने विसरून जा असे सांगून धमकावले. याप्रकरणी अखेर सहा महिन्यानंतर पियुष पाटील याने बुधवारी २६ एप्रिल रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार ॲड. विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, सुहास वसंत चौधरी, यश सुहास चौधरी, सारंग सुहास चौधरी, नरेंद्र गुलाबराव गांगुर्डे, रागिणी सुहास चौधरी, शैलजा नेरंद्र गांगुर्डे यांच्या विरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ॲड. विजय पाटील यांच्यासह इतर दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version