Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तेलगणात केसीआर यांना धक्का, जनतेचा काँग्रेसला साथ

हैदराबाद-वृत्तसेवा ।  तेलंगणा विधानसभा निवडणूक निकालात सत्ताधारी भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बसताना दिसत आहे. देशातील सर्वात तरुण राज्य असलेल्या तेलंगणात काँग्रेस प्रथमच सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. तेलंगणात विधानसभेच्या एकूण ११९ जागा आहेत. पैकी ६३ जागांवर काँग्रेसनं मुसंडी मारली आहे. सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोठी पिछेहाट होताना दिसत आहे.

तेलंगणात काँग्रेसची सत्ता येईल असा अंदाज जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला. तो खरा ठरताना दिसत आहे. काँग्रेसनं पहिल्या कलांमध्ये ६० चा आकडा पार केला आहे. तेलंगणाची स्थापना झाल्यापासून तिथे के. चंद्रशेखर राव यांची सत्ता आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनं आतापर्यंत तेलंगणात सत्ता राखली. त्यानंतर पक्षविस्ताराच्या दृष्टीकोनातून केसीआर यांनी पक्षाचं नाव बदलून भारत राष्ट्र समिती केलं. पण त्यांना त्यांच्याच राज्यात धक्का बसताना दिसत आहे.

भारत राष्ट्र समिती नावानं पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या केसीआर यांना मतदारांना झटका दिला आहे. त्यांच्या पक्षाचे केवळ ४० उमेदवार आघाडीवर आहेत. तर ओवेसींच्या एमआयएमचे ७ उमेदवार पुढे आहेत. तर भाजपला ६ मतदारसंघांत आघाडी मिळाली आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा तेलंगणातून गेली होती. त्यामुळे राज्यातलं वातावरण काँग्रेससाठी पोषक बनलं. त्याचे परिणाम आता दिसले आहेत

मागील निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षानं राज्यात तब्बल ८८ जागा जिंकल्या. काँग्रेसला केवळ १९ जागा मिळवता आल्या होत्या. गेल्या निवडणुकीत तब्बल ४६.९ टक्के मतं घेणाऱ्या केसीआर यांच्या पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी जोरदार झटका दिला आहे. राज्यात त्यांची दोन टर्म सत्ता आहे. त्याच्याच जोरावर त्यांनी देशभर विस्तार हाती घेतला. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात त्यांनी पाय रोवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण आता तेलंगणातील त्यांची सत्ता जाताना दिसत आहे.

Exit mobile version