Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर खडसेंना धुळ चारणार- शिवसेनेचा इशारा

भुसावळ प्रतिनिधी । युती झाली तरी एकनाथ खडसेंसाठी लोकसभेत काम करण्यास साफ नकार देत त्यांना धुळ चारण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

याबाबत वृत्तांत असा की, एकीकडे युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत असतांना दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेने भाजपविरूध्द शड्डू ठोकण्यास प्रारंभ केल्याचे स्पष्ट झाले आहे. भुसावळ येथे शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीत खडसे वा त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासाठी काम करण्यास साफ नकार देण्यात आला.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत शिवसेना पदाधिकार्‍यांनी आक्रमक भूमिका घेतली. भाजपमुळे रावेर मतदार संघातील शिवसेनेची वाढ खुंटली असून ही जागा शिवसेनेला सोडावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. खडसेंनी त्यांच्या जाहीर सभेत अनेक वेळा शिवसेना संपवण्याची भाषा केलेली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा निवडणुकीत खडसे किंवा त्यांच्या कुटुंबात उमेदवारी दिल्यास शिवसैनिक युतीचे काम करणार नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांना धुळ चारू असा संकल्प याप्रसंगी करण्यात आला. याबाबत मातोश्रीवर दि.२१ रोजी एक शिष्टमंडळ पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती याप्रसंगी देण्यात आली.

या बैठकीला विलास मुळे, डॉ.मनोहर पाटील, अशोक पाटील, गोपाळ सोनवणे, महेंद्र शर्मा, अफसर खान, दिलीप पाटील, विनोद पाडर, कडू पाटील, संतोष महाजन, तुकाराम कोळी, गुणवंत भोई, विजय चौधरी, चंद्रकांत शर्मा, सुधाकर सराफ, गणेश पांढरे, सुनील बारी, अप्पा चौधरी, विश्‍वनाथ कोळी, हिराशेठ राणे, आतिष सारवान, प्रशांत भालशंकर, राजेंद्र तळेले उपस्थित होते .

Exit mobile version