Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कावळे मात्र नष्ट होतील ! : नड्डा यांना शिवसेनेचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कावळ्यांच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील असा इशारा शिवसेनेने जेपी नड्डा यांना दिला आहे.

दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर टिकास्त्र सोडण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आता सांगितले आहे की, देशात फक्त भाजपच टिकेल. शिवसेनेसह प्रादेशिक पक्ष संपतील. नड्डा यांचे विधान अहंकार व गर्वाने फुगलेले आहे. नड्डा यांनी शिवसेनेचा उल्लेख केला म्हणून सुरुवातीलाच सांगायला हवे. शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. संपूर्ण जग श्री. मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेले जे.पी. नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा प्रश्‍न यात विचारला आहे.

यात पुढे नमूद केले आहे की, आज भाजप मोदींच्या नेतृत्वाखाली मजबूत स्थितीत आहे, पण राजकारणाइतके चंचल काहीच नसते. लोकांचे मन कधी बदलेल त्याचा भरवसा नाही. हिंदू व मुसलमानांत सततची दरी निर्माण करायची, धर्मात वाद लावायचे हे सर्व निवडणुकीच्या ऐनभरात होत असते व त्यातून सध्याचा भाजप सतत निवडणुका जिंकत आहे. याचा अर्थ मुकाबल्यास कोणीच उरले नाही व प्रादेशिक पक्षांचे पतन झाले असे नाही. ‘संपवू’ वगैरे भाषा तुमच्या खिशातल्या फुटक्या कवडीच्यांना करा. नड्डा यांची भाषा लोकशाहीसाठी मारक आहे, पण ते ज्यांच्या सावलीत वावरत आहेत ते पाहता त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करावी?

यात पुढे नमूद केले आहे की, जे. पी. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना असा शाप दिला आहे की, भाजपच राहील व बाकीचे सगळे संपतील. मर्‍हाटीत एक म्हण आहे ती म्हणजे, कावळयाच्या शापाने गाय मरत नाही! नड्डा साहेबांना या म्हणीचा अर्थ समजावून सांगितला पाहिजे. दुसरे असे की, भाजपने खोटा खोटा का होईना, गोवंश हत्याबंदीचा कायदा केला आहे. त्यामुळे कावळयाच्या शापाने प्रादेशिक पक्षांच्या गायी मरणार नाहीत. उलट गोवंश वाढतच जाईल. कावळे मात्र नष्ट होतील. शिवसेना तर वाघ आहे. त्यामुळे वाघाची झेप तुम्हाला परवडणार नाही! असा इशारा यात देण्यात आला आहे.

Exit mobile version