Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

हिंदूस्थानने पाकचा कोथळाच बाहेर काढला- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । कलम-३७० हटवून हिंदुस्थानने पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढल्याचे नमूद करत शिवसेनेने आज या निर्णयावरून केंद्र सरकारचे अभिनंदन केले आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातील आजच्या अग्रलेखातून कलम-३७० हटविण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. यात म्हटले आहे की, पाकिस्तानने हिंदुस्थानशी असलेले व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान यापेक्षा दुसरे काय करू शकत होते? त्या देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अशीही धमकी दिली आहे की, कश्मीरातील ३७० कलम हटवल्यामुळे ङ्गपुलवामाफसारख्या घटना पुन्हा घडू शकतात. इम्रान खानचे हे वक्तव्य गंभीरपणे घ्यायला हवे. याचा सरळ अर्थ असा की, पुलवामातील हिंदुस्थानी जवानांवरील हल्ल्यामागचे सूत्रधार पाकिस्तान होते. ४० जवानांच्या बलिदानातून जो अंगार देशात उफाळून आला त्यात ३७० कलमाची राख झाली. पाकिस्तानने आता हे मान्य केले पाहिजे की, आमच्या दृष्टीने कश्मीरचा प्रश्‍न संपला आहे व विषय राहिला आहे तो पाकने बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवलेल्या कश्मीरविषयी. तो विषय लवकरच निकाली लागेल. अखंड हिंदुस्थानचे स्वप्न साकार होत आहे व हा वारू आता कोणीही अडवू शकत नाही.

अग्रलेखात पुढे नमूद केले आहे की, ३७० कलमाचा खात्मा केल्यावर इस्लामाबादच्या रस्त्यांवर शिवसेनेची पोस्टर्स व बॅनर्स झळकले. याचा अर्थ असा की, पाकडयांच्या हद्दीत शिवसेना घुसली आहे. लवकरच हिंदुस्थानी सेनाही घुसेल व तसे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. त्यामुळे इम्रान खान आता जी आदळआपट करीत आहेत त्यातून काय निष्पन्न होणार? पाकिस्तान हिंदुस्थानशी संबंध तोडत आहे याचा सगळयात जास्त फटका त्यांनाच बसणार आहे. पाकिस्तानच्या हिंदुस्थानद्वेषावर तरारलेल्या राजकारणावर पाणी पडले. चर्चेची आता गरज नाही. अमित शहा यांनी कश्मीरात पहिले पाऊल टाकले व दुसरे पाऊल पाकव्याप्त कश्मीरात पडेल हे नक्की. हिंदुस्थानच्या भूमीवर आमचाच कायदा चालेल. त्यासाठी पाकडयांना, अमेरिकेला आणि बिनदाताच्या युनोला विचारण्याची गरज नाही. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. तसेच आता काश्मीरमधील कलम ३७० हटवून पाकिस्तानचा कोथळाच बाहेर काढल्याचे कौतुकोदगार या अग्रलेखात काढण्यात आलेले आहेत.

Exit mobile version