Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संघ राष्ट्रीय बाण्याची संघटना : शिवसेनेने अख्तर यांना सुनावले !

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राष्ट्रीय बाण्याची संघटना असून त्यांची तालीबानशी तुलना होऊच शकत नसल्याचे नमूद करत आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातून विख्यात शायर जावेद अख्तर यांना सुनावण्यात आले आहे.

विख्यात शायर, गीतकार तथा पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी संघासह हिंदुत्ववादी संघटनांची तालीबान्यांशी तुलना केल्यने खळबळ उडाली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज दैनिक सामनाच्या अग्रलेखातून अख्तर यांच्यावर टीका करत संघाची जोरदार पाठराखण करण्यात आली आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, जावेद अख्तर हे त्यांच्या सडेतोड वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहेत. या देशातील धर्मांधता, मुस्लिम समाजातील अतिरेकी विचार, राष्ट्राच्या मुख्य प्रवाहापासून फटकून वागण्याचे धोरण यावर जावेद यांनी कठोर प्रहार केले आहेत. तरीही संघाची तालिबानशी केलेली तुलना आम्हाला मान्य नाही. संघ आणि तालिबानसारख्या संघटनांच्या ध्येयामध्ये कोणताही फरक नसल्याचे त्यांचे म्हणणे सर्वस्वी चूक आहे. संघाची भूमिका व त्यांच्या विचारांशी मतभेद असू शकतात आणि हे मतभेद जावेद अख्तर वारंवार मांडत असतात. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष आहे म्हणून हिंदू राष्ट्र संकल्पनेस पाठिंबा देणारे तालिबानी विकृतीचे आहेत, असे कसे म्हणता येईल?

यात पुढे म्हटले आहे की, आपल्या देशाला हिंदू राष्ट्र बनवू पाहणारे जे जे लोक व संघटना आहेत, त्यांची हिंदू राष्ट्रनिर्मितीची कल्पना मवाळ आहे. धर्माच्या आधारावर पाकिस्तान व हिंदुस्थान ही दोन राष्ट्रे बनल्यावर हिंदूंना त्यांच्याच हिंदुस्थानात सातत्याने डावलले जाऊ नये, हिंदुत्व म्हणजे एक संस्कृती असून त्यावर आक्रमण करणाऱयांना रोखण्याचे हक्क ते मागत आहेत. अयोध्येत बाबरी पाडण्यात आली व तेथे राममंदिर उभे राहत आहे, पण आजही बाबरीसाठी जे हिजडेगिरी करीत आहेत त्यांचा बंदोबस्त करा व तो कायद्याने करा, असे कोणी म्हणत असतील तर ते तालिबानी कसे? कश्मीरातून ३७० कलम हटविले. त्यामुळे कश्मीरचा कोंडलेला श्वास मोकळा झाला. हा श्वास पुन्हा बंद करा, अशी मागणी करणारे लोकच तालिबानी आहेत. कश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. त्यावर कोणाचेही मतभेद असता कामा नयेत. मागच्या काळात ङ्गबीफफ प्रकरणावरून जो धार्मिक उन्माद घडला व त्या सर्व प्रकरणात जे झुंडबळी गेले, त्याचे समर्थन शिवसेनाच काय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही केलेले नाही.

यात शेवटी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक राष्ट्रीय बाण्याची संघटना आहे, याबाबत दुमत असण्याची शक्यता नाही. जगातील प्रत्येक राष्ट्र आज धर्माच्या पायावर उभे आहे. चीन, श्रीलंकेसारख्या राष्ट्रांचा अधिकृत धर्म बौद्ध, अमेरिका, युरोपियन राष्ट्रे ख्रिश्चन, तर बाकी सर्व राष्ट्रे इस्लामिक रिपब्लिक म्हणून आपापल्या धर्माची शेखी मिरवीत आहेत; पण जगाच्या पाठीवर एक तरी हिंदू राष्ट्र आहे काय? हिंदुस्थानात बहुसंख्य हिंदू असूनही ते राष्ट्र आज धर्मनिरपेक्षतेचाच झेंडा फडकवून उभे आहे. बहुसंख्य हिंदूंना सतत डावलले जाऊ नये हीच एक माफक अपेक्षा त्यांची आहे असे यात सांगण्यात आले आहे.

Exit mobile version