Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

राहूल यांना आणा…नाही तर लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील ! – शिवसेना

मुंबई । काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा पत्रप्रचंच म्हणजे फसलेले नाटक असल्याचे नमूद करत राजकीय मंचावर राहूल गांधी यांना लवकर आणा…अन्यथा लोक नाटकाचे पडदे व प्रॉपर्टी चोरून नेतील असा सल्ला वजा इशारा आज शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे.

काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलहावर आज शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनात भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, काँग्रेसच्या २३ प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थडांवले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे काय? काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी करणारे एक पत्र जुन्या काँग्रेस पुढार्‍यांनी सोनिया गांधी यांना लिहिले. ज्यांनी हे पत्र लिहिले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यापैकी एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही. तरीही यापैकी अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत.

पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेससाठी खस्ता खाल्ल्या तशा श्री. आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली, पण या घडीस राजकारणातील त्यांची सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम मॅनेजर किंवा सल्लागार आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? सातार्‍यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते. या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या पत्रनेत्यांना कोणी रोखले आहे?

राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळयाने केले आहे. राहुल यांचे नेतृत्व मारायचे व कुजवायचे या राष्ट्रीय षड्यंत्रात घरभेदी सामील होतात तेव्हा पक्षाचे पानिपत नक्कीच होत असते. राहुल गांधी यांनी त्याच संतापातून लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे अध्यक्षपद सोडले. राहुल व प्रियंकाचे म्हणणे तेच होतेआता हा पक्ष तुम्हीच चालवा, वाटल्यास गांधी परिवाराबाहेरचा अध्यक्ष नेमा. राहुल यांनी हे अत्यंत खुलेपणाने सांगितले व त्यात कोणतीही कटुता नव्हती. सर्व जुने नेते स्वतःचे ङ्गस्थानफ जपण्यासाठी सक्रियता दाखवतात, प्रसंगी भाजपशी हातमिळवणी करतात, पण पक्ष म्हणून मोठी झेप घ्यावी असे त्यांना वाटत नाही.

यात पुढे नमूद केले आहे की, राज्याराज्यांचे काँग्रेसचे वतनदार स्वतःपुरते पाहतात. पक्ष त्यांच्या खिजगणतीतही नाही. पक्षात जमले नाही की भाजपमध्ये पळायचे हीच सध्या सक्रियता झाली आहे. हा नवा राजकीय कोरोना व्हायरसच म्हणावा लागेल. सोनिया गांधी, राहुल गांधी यावर काय करणार? म्हणूनच पत्र पुढार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेस व्यापक पाठिंबा मिळू शकला नाही. काँग्रेस वर्किंग कमिटीतील वादळ व आधीचे पत्रप्रयोग म्हणजे आडगावच्या चार हौशा-गवशांनी बसविलेला ङ्गएकच प्यालाफ या नाटकाचा रेंगाळलेला प्रयोग होता. नाटक नीट बसले नाही व पात्रांच्या मूर्खपणामुळे प्रेक्षकांनी नाटक जागेवरच बंद पाडले, पण नवा प्रयोग नव्या संचात राहुल गांधींनी लवकरच राजकीय मंचावर आणला नाही तर लोक नाटकाचे पडदे आणि प्रॉपर्टी चोरून नेतील! असा इशारा या अग्रलेखातून देण्यात आला आहे.

Exit mobile version