Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर केंद्र सरकारचा भ्रमाचा भोपळा फुटणार : शिवसेना

मुंबई प्रतिनिधी | पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे देशातील नागरिकांचे मत परिवर्तन होईल हा केंद्र सरकारचा भ्रम असून हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार असल्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखातून आज पुन्हा एकदा इंधन दरांमध्ये झालेल्या कपातीवर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, केंद्र सरकारने अखेर पेट्रोलडिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारचे हे सर्वसामान्यांना दिवाळी गिफ्ट वगैरे आहे, असे ढोल आता सत्ताधारी मंडळी पिटत आहेत. तेरा राज्यांतील लोकसभाविधानसभा पोटनिवडणुकांत भारतीय जनता पक्षाचे ढोल मतदारांनी फोडले असले तरी त्यांचे ढोल पिटण्याची हौस काही कमी झालेली नाही. वस्तुस्थिती ही आहे की, या पोटनिवडणुकांतील पराभवामुळेच केंद्रातील सरकारला हे शहाणपण आले आहे. सरकारला इंधन स्वस्ताईची दिवाळी गिफ्टच द्यायची होती तर हा निर्णय दिवाळीच्या पूर्वसंध्येला किंवा त्यापूर्वी का घेतला नाही?

केंद्राने काही प्रमाणात जनतेला दिलासा दिला हे खरे असले तरी ही काही दिवाळी गिफ्ट वगैरे म्हणता येणार नाही. शिवाय इंधनाचे दर खूप खाली घसरले आहेत असे नाही. त्यामुळे महागाईचा वणवा विझेल अशी अपेक्षा करता येणार नाही. म्हणजे पेट्रोलडिझेलवरील खर्च किंचित कमी होईल, पण सर्वसामान्यांचा रिकामा झालेला खिसा भरला, असे अजिबात होणार नाही.

यात पुढे नमूद केले आहे की, मुळात आधी भाव भरपूर वाढवायचे आणि मग किंचित कमी करून दिलासा, दिवाळी गिफ्ट वगैरे गोष्टी करायच्या असा हा इंधन दरकपातीचा देखावा आहे. तेरा राज्यांतील पोटनिवडणुकांत मतदारांनी आरसा दाखविला नसता तर कदाचित केंद्रातील सत्ताधार्‍यांनी स्वतःला त्या आरशात पाहण्याची तसदीही घेतली नसती. ठीक आहे. पोटनिवडणुकांतील पराभवाच्या धक्क्याने का होईना, केंद्र सरकारला जाग आली आणि त्यांनी इंधन स्वस्ताईचा देखावा केला, हेही नसे थोडके. अर्थात, या देखाव्याची जनतेला भुरळ पडेल आणि पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकीत मतपरिवर्तन होईल, अशी सरकार पक्षाची अपेक्षा असेल तर त्यांचा हा भ्रमाचा भोपळाही या पोटनिवडणुकीप्रमाणे फुटणार, हे निश्चित आहे असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Exit mobile version