Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना म्हणते- ”वारा आमच्या दिशेने वळला !”

मुंबई प्रतिनिधी । सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडणार्‍या शिवसेनेने आता नरमाईची भूमिका घेत युतीचे समर्थन करतांना वारा आपल्या दिशेने वळल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनातून सातत्याने भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. आता युतीनंतर मात्र हा पवित्रा बदलण्याचे संकेत आजच्या अग्रलेखातून दिसून आले आहेत. आज तलवार म्यानबंद नाही, वारा आमच्या दिशेने वळला या शीर्षकाखाली अग्रलेख प्रसिध्द करण्यात आला असून यात युतीबाबत सारवासारव करण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत तसे वैर नव्हते. मुळात राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीएला कल्हई करण्याचे प्रयत्न गेल्या महिनाभरापासून सुरू झाले. या एनडीएचे जनकत्व भाजपइतकेच शिवसेना, अकाली दलाकडे आहेच. नितीश कुमार वगैरे पुन्हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बसू शकतात, मग शिवसेना तर त्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीची बरोबरीची हिस्सेदारच आहे. २०१४ सालातली परिस्थिती वेगळी होती. मोदी यांचा उदय व त्यांचे सादरीकरण लोकांना भिडले व एक लाट काँग्रेस, त्यांच्या बगलबच्च्यांविरोधात निर्माण झाली. मात्र आता त्या लाटेची उंची व तुफान कमी झाले आहे आणि २०१९ ची स्थिती ही लाटेवर निवडणुका लढण्याची नसून विचार, काम व भविष्य यावर लढण्याची आहे.

अग्रलेखातन पुढे म्हटले आहे की, शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली नाही. आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत ते उद्याच कळेल, पण वारे आमच्या बाजूला वळले. वारा येईल तशी आम्ही पाठ फिरवली नाही याची नोंद इतिहासाला घ्यावीच लागेल. तूर्त इतकेच पुरे! तलवारीची धार कायम आहे व शिवसेनेची तलवार म्यानबंद नसल्याचे प्रतिपादन यात करण्यात आले आहे.

Exit mobile version