Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना फोडल्याची खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न- महेश तपासे

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बंडखोर आमदारांनी शिवसेना फोडून ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वत:च्या कृतीला योग्य दाखवून त्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माथ्यावर मारण्याचा हा प्रयत्न रामदास कदम यांच्यासह काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले आहे.

२०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी – शिवसेना -काँग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत नाव आले आहे. त्यामुळे उध्दव ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस उध्दव ठाकरे यांच्याच मागे खंबीरपणे उभी आहे असेही महेश तपासे म्हणाले.

शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार भाजप असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार खासदार यांना भयभीत केले गेले आहे आणि यामध्ये उध्दव ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी मातोश्रीशी कशी गद्दारी केली हे पहात आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाली आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version