Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस पक्ष उरलाय का ? – शिवसेनेचा सवाल

मुंबई प्रतिनिधी । प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड करण्यात आली असली तरी नेतृत्व करण्यासाठी हा पक्ष उरला आहे का असा खोचक सवाल शिवसेनेने आज विचारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामना या दैनिकाच्या संपादकीयमधून आज काँग्रेसला जोरदार टोला लगावण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, काँग्रेस पक्षाला अद्यापि राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. चव्हाण गेले व थोरात आले. अर्थात त्यामुळे असा काय फरक पडणार आहे? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नाही. ज्यांनी वर्षानुवर्षे काँग्रेसची वतनदारी केली, सर्वोच्च पदे मिळवली असे सर्व प्रमुख लोक महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात काँग्रेसचा त्याग करीत आहेत. महाराष्ट्रातही वेगळे काही घडताना दिसत नाही. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपात विलीन झाले, त्याचप्रमाणे गोवा विधानसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते १० आमदारांसह भाजपात विरघळून गेले आहेत. राज्यात हीच अवस्था आहे. या अवस्थेतून काँग्रेसला बाहेर काढण्याचे आव्हान बाळासाहेब थोरातांवर असले तरी नेतृत्व करण्यासाठी पक्ष उरलेला आहे का ? असा प्रश्‍न यात विचारण्यात आला आहे.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, सत्ताधारी म्हणून सोडाच, पण विरोधी पक्ष म्हणून तरी काँग्रेसने धड जबाबदारी पार पाडली आहे असे दिसत नाही. राहुल गांधी यांच्या रिकाम्या जागी काँग्रेसला नगास नग तर मिळालेला नाहीच, पण महाराष्ट्रातही अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नव्हता. अखेर आता त्या पदावर बाळासाहेब थोरात विराजमान झाले, पण त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रात जात निहाय पाच कार्याध्यक्षही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसने एक नव्हे, तर सहा अध्यक्ष नेमले आहेत. काँग्रेसच्या डोक्यातील जात व धर्माचे खूळ काही जात नाही. विदर्भातील नितीन राऊत (अनुसूचित जाती), विदर्भाच्याच यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लिम), विश्‍वजित कदम (मराठा) व बसवराज पाटील (लिंगायत) अशी ही जात पंचायत काँग्रेसने नेमली असली तरी लोकसभा निवडणुकीत त्यापैकी एकही समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला दिसत नसल्याचे यात म्हटले आहे.

Exit mobile version