Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खडसे समर्थक शिवराज पाटलांसह अन्य पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा राष्ट्रवादीचे माजी सोशल मीडिया जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांनी आज आपल्या सहकार्‍यांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला.

मुक्ताईनगरातील एक मोठा पदाधिकारी हा लवकरच आमदार चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सायंकाळीच समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून हे वृत्त आम्ही प्रकाशित केल्यानंतर या चर्चेला मोठा वेग आला.

दरम्यान, आम्ही दिलेल्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून मुक्ताईनगर मतदारसंघातील खडसे समर्थकांनी आज जळगावात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला. यात मुक्ताईनगर येथील राष्ट्रवादी चे सोशल मीडियाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील, निंभोरा स्टेशन राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस वाय. डी. पाटील, निंभोरा स्टेशन येथील उपसरपंच प्रशांत पाटील,राष्ट्रवादी सोशल मीडियाचे कार्यकर्ते शुभम मुर्‍हेकर या प्रमुख पदाधिकार्‍यांसह अन्य समर्थकांनी आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.

जळगाव येथील अजिंठा विश्रामगृहात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी या सर्वांचे स्वागत केले. याप्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवराज पाटील हे आमदार एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक असून त्यांच्या माध्यमातून खडसेंचा एक कट्टर शिलेदार हा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गोटात दाखल झाल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Exit mobile version