Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रोपवाटिका जगविण्यात शिवनेरी फाउंडेशनला यश

चाळीसगाव प्रतिनिधी । आ.मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व ‘शिवनेरी फाउंडेशन’च्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण यांच्या संकल्पनेतून मागील उन्हाळ्यात बिलाखेड शिवारातील रोपवाटिकेत १० हजार वृक्षांची निर्मिती केली गेली. कडक उन्हाळ्यात देखील वृक्ष जगविण्यात शिवनेरी फाउंडेशनच्या सदस्यांनी घेतलेल्या मेहनतीला फळ मिळाले आहे.  

त्यांच्या सर्वांच्या मेहनतीला फळ आले असून २० जुलै २०२१ आषाढी एकादशी पासून ‘हरित वारी’अभियानांतर्गत सदर १० हजार वृक्ष हे चाळीसगाव तालुक्यातील ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था व वैयक्तिक नागरिकांना पर्यंत शिवनेरी फाउंडेशनतर्फे मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर ‘हरित वारी’ अभियानासाठी शिवनेरी फाउंडेशनचे तुषार देसले, धीरज पवार, सुर्यकांत शेलार, सम्राट सोनवणे, यश चिंचोले, मयूर पाटील, बंटी घोरपडे, आदी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत तालुक्यातील वाघडू, वाकडी, शिंदी, जामडी, सेवा नगर तांडा, बिलाखेड, वलठाण, माळशेवगे – शेवरी,  ग्रामपंचायत तसेच प्रजापती ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, साने गुरुजी माध्यमिक विद्यालय वडाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेवानगर तांडा यांना व १०० हून अधिक नागरिकांना लिंब, काशिद, कांचन, बांबू, करण, एन्ट्री, चिंच, आवळा, सिताफळ आदी प्रजातींची वृक्ष वाटप करण्यात आली आहे. 

‘हरित वारी’ अभियानाविषयी शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांनी  माहिती देताना सांगितले की, कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपुराच्या पांडुरंगाशी भेटीत आपला खंड पडत आहे मात्र ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे यावर्षी निसर्गसंवर्धनासाठी जास्तीत जास्त वृक्ष लावून “हरित वारी” साजरी करण्याचा संकल्प केला आहे. सद्यस्थितीत पांडुरंगाच्या कृपेने वरुणराजाने देखील आपल्या तालुक्यात जोरदार हजेरी लावल्याने वृक्ष लागवडीसाठी पोषक असे वातावरण आहे. केवळ वृक्ष लागवडच नव्हे तर त्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी घेणाऱ्या ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था व वैयक्तिक नागरिकांना आतापर्यंत ५ हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने अजून ५ हजार वृक्ष पुढील काही दिवसात उपलब्ध केली जातील असे सौ.चव्हाण यांनी सांगितले.

Exit mobile version