Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नशिराबादचा पहिला नगराध्यक्ष शिवसेनेचाच ! ना. गुलाबराव पाटील

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील नगरपालिकेचे नोटिफिकेशन या महिन्याच्या अखेरीस निघणार असून येथील पहिला नगराध्यक्ष हा शिवसेनेचाच असणार आहे. कार्यकर्त्यांनी सुक्ष्म नियोजनासह एकदिलाने प्रयत्न करून भगवा फडकावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. युवक हे परिवर्तनातील सर्वात महत्वाची भूमिका निभावणार असून त्यांनी आगामी निवडणुकीत सक्रीय सहभाग घेण्याचे आवाहन केले. ते नशिराबाद येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांच्या संयुक्त बैठकीत बोलत होते.

नशिराबाद नगरपालिकेची प्रक्रिया अंतीम टप्प्यात आली असून या अनुषंगाने पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी येथे युवासेना व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेतली. यात ते म्हणाले की, जिल्हा परिषदेकडचा रिपोर्ट हा बाकी असून आपण स्वत: हा अहवाल उद्या मंत्रालयात घेऊन जात आहोत. यामुळे या महिन्याच्या अखेरीस नशिराबादला नगरपालिका होणार असल्याचे निश्‍चीत आहे. या आगामी निवडणुकीला सामोरे जातांना शिवसैनिकांनी सुक्ष्म नियोजनाला महत्व देण्याची गरज आहे. वेळप्रसंगी गनीमी काव्याचा वापरू करून आपण निवडणुकीत यश संपादन करण्याचे पूर्ण प्रयत्न करावेत. यासाठी युवा सेवा व शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी सदस्य नोंदणीला प्राधान्य द्यावे. निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी सुक्ष्म नियोजन हा घटक सर्वात महत्वाचा आहे. याच्या मदतीने आपण निश्‍चीतच निवडणुकीत बाजी मारणार आहोत.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, नशिराबाद येथे मुस्लीम मतदारसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. या समुदायाचा शिवसेनेबाबतचा दृष्टीकोन अलीकडच्या काळात बदललेला आहे. आता लोक जात व धर्माच्या पलीकडे विकासाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले आहे. याचे सर्वात मोठे उदाहरण हे धरणगाव येथील आहे. तेथे ७० टक्के हिंदू तर ३० टक्के मुस्लीम समाज असतांनाही सलीम पटेल यांच्यासारख्या शिवसैनिकाला लोकांनी निवडून दिले ते त्यांच्या विकासाच्या व्हिजनवरच ! यामुळे नशिराबादमध्येही विकासाच्या बळावरच आपण विजय संपादन करणार असल्याचा आशावाद ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांनी युवक हे आगामी निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावू शकतात असे नमूद केले. ते म्हणाले की, निवडणुक प्रक्रियेत युवक हे परिवर्तनाचे काम करत असतात. प्रत्येकाने आपला व्यवसाय व रोजी-रोटी सांभाळून राजकारणात सक्रीय व्हावे. आगामी निवडणुकीत तरूणाईच्या बळावर शिवसेना विजय संपादन करणार असल्याचा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आधीच्या नशिराबाद ग्रामपंचायतीतील गैरव्यवहाराच्या अनेक तक्रारी ग्रामस्थानी केल्या असून याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तक्रार केली असून याची योग्य ती चौकशी होणार असल्याची महत्वाची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.

याप्रसंगी जिल्हा प्रमुख तथा जळगांव मनपा चे माजी महापौर विष्णुभाऊ भंगाळे यांनी युवासेना व शिवसेना व महिला आघाडी चे मजबूत संघटन बांधणी बाबत कानमंत्र दिला तर युवासेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू खंडारेसर यांनी केले. प्रास्ताविक शहर प्रमुख  विकास धनगर यांनी केले तर आभार युवासेनेचे चेतन बऱ्हाटे यांनी मानले.

यांची होती उपस्थिती

शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णूभाऊ भगाळे, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख शिवराज पाटील, तालुका प्रमुख राजु चव्हाण, शहरप्रमुख विकास धनगर,युवासेना शहरप्रमुख चेतन बर्‍हाटे, संगायो सदस्य चंदु भोळे, कैलास नेरकर, संघटक आबा माळी, नितीन बेंडवाल, नितीन भोई, मोहन कोलते, दिपक बोंडे, महेंद्र कोळी,  विशाल सोनवणे, मयुर झटके, दिपक सपकाळे, संजय देशमुख, सोहन पाटील,सोपान कोळी, राज बेंडवाल, मनोज नाथ, दर्शन झटके, प्रकाश कनगरे, दिनेश सावळे, निलेश धनगर, सर्व युवासैनिक व शिवसैनिक यांची ऊपस्थिती होती.

 

Exit mobile version