Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मराठा आंदोलकांवरील लाठीमाराचा शिवसेना-उबाठातर्फे निषेध !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या अमानुष लाठीमाराचा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोर्चा काढून निषेध करण्यात आला. यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

जालना येथील मराठा क्रांती मोर्चावर पोलिस प्रशासनाने अमानुषपणे लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये आंदोलनात सहभागी झालेले मराठा समाजाचे पुरुष, महिला, युवक, युवती गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आज २ सप्टेंबर रोजी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिवतीर्थ या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयापासून उबाठा सेनेच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालया पर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

याप्रसंगी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमला. याप्रसंगी शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख रमेश बाफना, उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय पाटील, भरत खंडेलवाल, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, पप्पु जाधव, महिला आघाडीच्या जयश्री येवले, खंडु सोनवणे, शुभम पाटील, नाना वाघ, अजय पाटील, संतोष पाटील, नंदु पाटील यांचेसह मोठ्या संख्येने उबाठा सेना, युवासेना, महिला आघाडी व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जालना येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अमानुष केलेली मारहाणीची घटना अतिशय दुर्देवी व अतिशय संतापजनक आहे. मराठा आरक्षण हा राजकीय विषय नाही तर हा समाज हिताचा विषय आहे. हा लाठीचार्ज नाही तर अंदोलन कर्त्यावर शासन प्रणित हल्लाच आहे. माता भगिनीवर हात उचलणार्‍या सरकारचा व पोलिसांचा धिक्कार असो, मानव हिताला न शोभणारी घटना जालन्यात घडली. आहे. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पाचोरा यांच्या वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवित आहोत.

सदर आंदोलनात महिला, मुली, हे देखील होते. त्यांना देखील पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली महिला व पुरूष जखमी झाले सदरची घटना ही खूप निंदनीय आहे. महाराष्ट्र हे महिलांना आदर करणारे राज्य आहे. परंतु सध्याचे असंवेदनशील, निगरगट्ठ सरकार आहे. सदर पोलीस प्रशासनाने केलेल्या अमानुष लाठी चार्जची चौकशी होवून संबंधीतांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी असे न झाल्यास उ.बा.ठा. शिवसेना पाचोरा रस्त्यावर उतरेल व त्याच्या होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील अशा आशयाचे निवेदन पाचोरा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतर्फे तहसिलदार प्रविण चव्हाणके यांना देण्यात आले.

Exit mobile version