Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना सत्तेत आल्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या : सोमय्यांचा दावा

keerit somayya

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेना सत्तेत आल्याने मला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असून माझ्या जिवाला धोका आहे, असा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी केवळ दावाच केला नाही तर आपल्याला सुरक्षा मिळावी, यासाठी त्यांनी गृह सचिव आणि राज्यपालांना पत्रही पाठवले आहे. सोमय्या यांच्या या दाव्यामुळे शिवसेना विरुद्ध सोमय्या हा वाद पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात आधीपासूनच वितूष्ट आहे. किरीट सोमय्या यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत. त्यामुळे शिवसेना विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात आधीपासूनच वाद सुरू आहेत. लोकसभा निवडणुकी वेळी शिवसेनेने विरोध केल्यामुळेच किरीट सोमय्या यांना भाजपने तिकीट नाकारल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. किरीट सोमय्या यांना भाजपने तिकीट दिल्यास शिवसेनेचा उमेदवार उभा करण्यात येईल, अशी भूमिका घाटकोपरमधील स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याने ऐनवेळी सोमय्या यांना तिकीट नाकारून भाजपने मनोज कोटक यांना लोकसभेचे तिकीट दिले होते.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. धमकी संदर्भातील पत्र त्यांनी राज्याचे गृह सचिव व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठवले आहे. शिवसेनेची अरेरावी रेकॉर्डवर यावी, यासाठी मी गृहसचिव व राज्यपालांना पत्र पाठवले आहे, असे सोमय्या यांनी सांगितले आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी माझ्या सुरक्षेसंदर्भातील मुद्दा विधीमंडळात मांडला होता, असेही ते यावेळी म्हणाले.

शिवसेनेच्या कोणत्या नेत्यांकडून धमकी मिळाली, हे सांगण्यास मात्र किरीट सोमय्या यांनी नकार दिला आहे. काही गोष्टी बाहेर न आलेल्या बऱ्या असतात, असे ते म्हणाले. परंतु, शिवसेनेची राज्यात सत्ता आल्याने मला धमकी मिळत असून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्यावर शिवसैनिक हल्ला करण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या या दाव्यामुळे शिवसेना विरुद्ध सोमय्या सामना पुन्हा एकदा रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Exit mobile version