Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेनेतून बंडखोर तृप्ती सावंत यांची हकालपट्टी

trupti sawan

मुंबई प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान अगदी 2 दिवसांवर आलं असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बंडखोर तृप्ती सावतं यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. तृप्ती सावंत यांनी वांद्रे पूर्वमधून बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

तृप्ती सावंत या शिवसेनेचे माजी आमदार बाळा सावंत यांच्या पत्नी आहेत. मुस्लिमबहुल असलेल्या या मतदारसंघात बाळा सावंत यांनी मोठ्या हिकमतीनं दोनवेळा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला होता. त्यांच्या निधनानंतर तिथं तृप्ती सावंत यांना उमेदवारी देण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत करून सावंत पुन्हा निवडून आल्या होत्या.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत सावंत यांचं मन वळविण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्यांनी माघार न घेता प्रचार सुरूच ठेवला. नाशिकमध्ये ३६ नगरसेवकांसह ३५० पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर त्यांची पक्षातून तातडीने हकालपट्टी करण्यात आली होती. राज्यातील अनेक बंडखोरांवरही तत्परतेनं कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, सावंत यांच्यावर कारवाई करण्याचं पक्ष नेतृत्वानं टाळलं होतं. त्यामुळं शिवसैनिकांमध्येही कुजबूज होती. अखेर आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पक्षाच्या या निर्णयामुळं सावंत यांना बळ देणाऱ्या शिवसैनिकांना योग्य तो संदेश जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version