Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुंबई मेट्रो विरोधात शिवसेनेचे आमदार काते यांचे चिखलात बसून ठिय्या आंदोलन

70697106

मुंबई, वृतसेवा | मेट्रो कारशेडच्या कामामुळं रस्त्यावर पडलेले खड्डे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा निषेध करण्यासाठी मुंबईतील मानखुर्द इथं शिवसेनेनं आंदोलन सुरू केलं आहे. एमएमआरडीएनं नागरिकांच्या तक्रारींची तातडीनं दखल घ्यावी, या मागणीसाठी स्थानिक शिवसेना आमदार तुकाराम काते यांनी चक्क चिखलात बसून ठिय्या दिला आहे.

मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोची कामं सुरू आहेत. बोगद्यांची खोदकामं, खांबांची उभारणी यामुळं अनेक ठिकाणची वाहतूक वळविण्यात आली आहे. त्यातून वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली असून मुंबईकर त्रस्त आहेत. मानखुर्दमध्ये मेट्रोच्या कारशेडचं काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळं महाराष्ट्र नगरमधील रहिवाशांना रोजच्या रोज गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. स्थानिकांनी याबाबत आमदार काते यांच्याकडं तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन काते यांनी आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी चिखलात बसून ठिय्या दिला आहे. एमएमआरडीएचे अधिकारी येऊन नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत नाहीत तोपर्यंत येथून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Exit mobile version