Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिवसेना की चोरसेना – मनसेचा प्रश्न

मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | शिवसेनेच्या शनिवार दि. १४ तारखेला होणाऱ्या सभेचा टीझर प्रसारित करण्यात आला होता. संबंधित व्हिडीओ आणि फोटो ट्वीट करत त्यात मनसेच्या सभेची दृश्य वापरल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला असून याला शिवसेना की चोरसेना ? असा प्रश्न त्यांनी उपरोधिकपणे विचारला आहे.

याप्रसंगी शिवसेना मनसेचे नगरसेवक चोरता चोरता आता फोटोही चोरु लागली असल्याचा टोला काळे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मनसेच्या सभेला उत्तर देण्यासाठी येत्या १४ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत. शिवसेनेने या सभेचे टीझरही पब्लिश केलं होतं. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. यामध्ये शिवाजी पार्कवरच्या राज ठाकरेंच्या सभेचे फोटो शिवसेनेच्या व्हिडीओत वापरण्यात आल्याचा दावा मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला आहे.

मनसेचे नगरसेवक चोरता चोरता शिवसेना आता फोटोही चोरु लागली असा टोला त्यांनी लगावला असून शिवसेनेला नैराश्य येऊन आत्मविश्वास हरवलाय का? असा प्रश्न विचारत शिवसेनेने नाव बदलून ‘चोरसेना’ नावं ठेवावं का अशी कोपरखळी गजानन काळे यांनी मारली आहे.

यावर शिवसेनेने मनसेच्या दाव्यानंतर वर तो व्हिडीओ काढून टाकला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला होता. “मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.” हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. तसेच, “साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे.”, असं आवाहनंही या टीझरमधून करण्यात आलं होतं.

Exit mobile version