प्रतिनिधी सभेवर नियंत्रण मिळवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेचे आमदार आणि खासदारांसह पदाधिकार्‍यांमध्ये फूट पाडल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेवर लक्ष केंद्रीत केल्याची माहिती समोर आली आहे.

शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांना फोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधीमंडळ आणि संसदेत शिवसेना पक्षाला दणका दिला. यामुळे पक्षाची राज्यातील सत्ता जाऊन एकनात शिंदे हे स्वत: मुख्यमंत्री बनले आहेत. यानंतर त्यांनी पक्षातील १२ खासदारांचा स्वतंत्र गट देखील निर्माण केला. तर ठिकठिकाणचे पदाधिकारी आणि स्थानिक लोक प्रतिनिधीदेखील त्यांच्या गटात दाखल होत आहेत. यानंतर आता शिवसेना काबीज करण्यासाठी त्यांनी पावले उचलल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेच्या घटनेत शिवसेनाप्रमुख ते शाखाप्रमुख’अशी एकूण १३ पदे आहेत. आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, जिल्हा संपर्कप्रमुख आणि मुंबईतील विभागप्रमुख यांची मिळून एक प्रतिनिधी सभा आहे. प्रतिनिधी सभेत एकूण २८२ सदस्य आहेत. या प्रतिनिधी सभेच्या सदस्यांपैकी किमान दोन तृतीयांश म्हणजे १८८ सदस्यांचा शिंदे गटाला पाठिंबा मिळाला तर शिवसेनेवर ताबा मिळवणे त्यांना सोपे जाणार आहे. या दृष्टीने एकनाथ शिंदे यांनी तयारी सुरू केली असून त्यांच्या ’नंदनवन’ या शासकीय बंगल्यावर या सदस्यांची नव्याने नोंदणी सुरू आहे. तर राज्यभरातील प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची थेट भेऊ घेऊन त्यांना शिंदे यांच्यासोबत येण्याची मोर्चेबांधणी देखील करण्यात आलेली आहे.

Protected Content